आपल्या देशामध्ये केंद्रात अथवा राज्यात मंत्री किंवा सरकारी सेवेतील अधिकारी हे कर्तव्याची शपथ घेतात. यात अगदी राष्ट्रपतींपासून ते पोलिस अधिकारी आदींचा समावेश होतो. पंतप्रधान, मंत्री यांचे शपथविधी सोहळे हे एखाद्या जंगी कार्यक्रमांसारखे असतात. पंरतू भारतातील पंचायत राज व्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य अथवा त्यांचा प्रमुख अर्थात सरपंच यांनी शपथ घेण्याची प्रथा आपल्याकडे नाही. मात्र, मुळशी तालुक्याचे केंद्र असलेल्या पौड ग्रामपंचायतच्या नवनियुक्त सरपंच प्रमोद शेलार यांनी पदभार स्विकारताना घेतलेल्या शपथेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. ( Paud Gram Panchayat Sarpanch Pramod Shelar Take Constitution Oath Mulshi Taluka Watch Video )
ग्रामपंचायत पौड ही मुळशी तालुक्यातील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत आहे. ह्याचे कारण मुळशी तालुक्याचे तहसील आणि पोलिस केंद्र हे पौड येथे आहे. पौड तालुक्याचे गाव असल्याने येथील ग्रामपंचायत तितकीच जबाबदार आणि महत्वाची आहे. या ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच अजय कडू यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाळ पुर्ण केल्याने पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रमोद शेलार यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे पौडच्या सरपंच पदी प्रमोद शेलार हे बिनविरोध निवडले गेले.
त्यानंतर पौडचे ग्रामविकास अधिकारी विनोद दूधाळ यांनी नवनियुक्त सरपंच प्रमोद शेलार यांना संविधान शपथ दिली. प्रमोद शेलार यांच्याच कल्पनेतून हा शपथविधी सोहळा झाला. ‘आपण ज्या पदावर आहोत, त्या पदाकडे हजारो जनांच्या आशा अपेक्षा आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी आपण संविधानाच्याच तत्वाने चालले पाहिजे. महापुरुषांच्या विचारांवर चालले पाहिजे. या हेतूने सरपंच म्हणून कामकाज सुरु करण्यापूर्वी आपण ही शपथ घेऊन स्वतःला बांधून घेतले’ अशी प्रतिक्रिया प्रमोद शेलार यांनी दैनिक मावळसोबत बोलताना दिली.
पदभार स्विकारण्यापूर्वी आईवडीलांना वंदन करत, ग्रामदैवतांचे स्मरण करत, छत्रपती शिवराय आणि अन्य महापुरुषांना वंदन करुन संविधान साक्ष घेत प्रमोद शेलार यांनी कामाला सुरुवात केलीये, ही गोष्ट राज्यातील इतर ग्रामपंचायतींना आदर्श आहे. सरपंचाने पदभार स्विकारण्याआधी शपथ घेण्याचे हे दुर्मिळ उदाहरण पुणे जिल्ह्यात प्रथमच घडले आहे. तसेच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ( Paud Gram Panchayat Sarpanch Pramod Shelar Take Constitution Oath Mulshi Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ बुलेटीन : मावळ मनसेत ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; मावळ लोकसभा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरात “हर घर तिरंगा” अभियानामुळे राष्ट्रप्रेमाचे उत्स्फूर्त दर्शन
– वाडिवळे शाळेतील विद्यार्थ्यांना सीआयई इंडिया (CIE INDIA) कंपनीकडून शैक्षणिक साहित्यांचे कीट वाटप