मंडळी तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्वाची आहे. जर एखाद्या कुटुंबात शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात, पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. परंतू वारस नोंद करणं ही अत्यंत क्लिष्ट आणि सरकारी कार्यालयात खेटे मारायला लावणारी प्रक्रिया असते. मात्र आता या सर्व कटकटीपासून सामान्यांची सुटका होणार आहे.
कारण सातबारा उतारा असेल किंवा वारस नोंदणी करायची असेल किंवा जमिनी बाबतची अन्य काही कामं असतील, तुम्हाला सरकारी कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला घरबसल्या जमिनी संदर्भातील वारस नोंदणी, वडिलोपार्जित जमीन, घर, जमीन नोंदणी अशी अनेक कामे ऑनलाईन करता येणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे तलाठी कार्यालयात न जाताही तुम्ही घरातूनच मोबाईलवर वारस नोंदीसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करू शकता. ( there is no need to go to talathi office to register heirs on Sat Bara Apply online from home know in details )
सरकारकडून सामान्यांना मोठा दिलासा…
शेतकऱ्यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी आता सरकार सुलभ करताना दिसत आहे. त्या अनुषंगाने निर्णय घेताना दिसत आहे. यातच आता शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन विभागांकडून एक ऑगस्टपासून एक सुविधा संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आली आहे. महाभूमी संकेतस्थळावर डिजीटल सातबारा तसेच ई फेरफार अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यावर नोंदणी केल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. ऑनलाईन अर्ज करून जमिनीचे काम दाखल करता येणार असून त्याची पडताळणीही ऑनलाईन होणार आहे. यात वारस नोंद करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
अशी कराल ऑनलाईन वारस नोंद…
शासनाच्या महाभूमी संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे. त्यानंतर वारस नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. ऑनलाईनच पेमेंट देखील करता येणार आहे. हा अर्ज तलाठ्याकडे जाईल. त्यानंतर तलाठी त्या अर्जाची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करेल. जर अर्जात कोणत्या कागदपत्रांची कमतरता असेल तर तुम्हाला त्याबाबत इमेलद्वारे कळवण्यात येईल. जर कागदपत्र पूर्ण असतील तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यात येते.
वारस नोंदसाठी लागणारी कागदपत्रे…
- मृत्यू दाखल्याची सत्यप्रत (ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते)
- कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती देण्याकरता रेशन कार्डची प्रत
- मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे 8 अ चे उतारे
- एक शपथपत्र (यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावे तसेच त्यांचा संपूर्ण पत्ता)
ऑनलाईन वारस नोंदसाठी समोरील लिंकवर क्लिक करा – bhulekh.mahabhumi.gov.in
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ मनसेत जोरदार इन्कमिंग! वडगाव शहर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्षपदी ओंकार भांगरे तर उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड
– स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval
– हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा