पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : समाजसेवेचं व्रत जोपासणारी गौरीताई ही उच्चशिक्षित तरुणी. वस्त्यांंमध्ये राहणाऱ्या वंचित कुटुंबातील लेकरांना ती आईसारखी माया लावतेय. ती या मुलांना चांगल्या सवयी लावतेय-सुंदर संस्कार देतेय. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतेय. ती या लेकरांचा अभ्यास घेते, त्यांना कला जोपासायला शिकवतेय- त्यांच्याशी खेळते आणि त्यांना फिरायलाही घेऊन जातेय. कारण, गौरीताईला परिस्थितीनं गांजलेल्या मुलांचा सर्वांगिण विकास करायचाय अन् घडवयचाय समाजात चांगला बदल. ( navratri special abhivadan navdurgana )
गौरीताई सोनवणे (वय 38) यांनी वाटचाल तरुणांसाठी स्फूर्तीदायी आहे. समाजकार्याची आवड असल्याने गौरीताईनं एम. एस. डब्ल्यू ही पदवी पूर्ण केली. त्यांनतर स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केले. झोपडपट्टीत राहणारया लहान मुलांची त्यांच्या पालकांच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे फारच हेळसांड होतेय, हे जवळून पाहिले आणि हे चित्र बदलण्याचा प्रण केला. काम एके कामच करत पुढं गौरीताईने स्वतःची अभिनव विकास फाऊंडेशन ही संस्था सुरु केली आणि संस्थेद्वारे नावाप्रमाणेच वंचित मुलांच्या विकासाचे ‘अभिनव’कार्य ती करत आहे.
- पुण्यातील कोथरुड परिसरातील वस्त्यांमधून गौरीताईने संस्थेच्या कामाचा प्रारंभ केला. वस्त्यांचा अभ्यास केला, तिथल्या लहान मुलांच्या गरजा जाणून घेतल्या. पालकांशी बोलून केळेवाडीतील वस्तीतच एका लहानशा पत्र्याच्या खोलीत विनाशुल्क शाळा सुरु केली. ही शाळा रोज सायंकाळी भरायची आणि गौरीताई हसतखेळत मुलांचा अभ्यास घ्यायची.
मराठी व इंग्रजी अक्षरओळख, शब्दवाचन, अंक पाठांतर, छोटी गणितं सोडवायची….अशा अभ्यासातून मुलांच्या शिक्षणाचा पाया पक्का होऊ लागला. शिस्तीचे धडे मिळाले. अभ्यासाबरोबरच ताईने मुलांना प्रार्थना-श्लोक शिकवले, गोष्टी ऐकवल्या. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यामुळं इथल्या चिमुकल्यांना अभ्यासाची आवड लागली, सारी मुलं शाळेची वाट पाहू लागली. याबरोबरच मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल पालकांना सातत्याने समजून सांगितले. हळूहळू आपल्या लेकरांमध्ये बदल झालेला पाहताना पालकही आनंदून गेले आणि गौरीताईची वस्तीतील शाळा सर्वांना आपलीशी झाली.
पुढे हा कार्यविस्तार बहरत गेलाय. गेल्या तीन-चार वर्षात अभिनव विकास फाऊंडेशन आणखी वस्त्यांमध्ये पोचली आहे. पुण्यात आणि मुळशी तालुक्यातील सुतारवाडीयेथील आदिवासी वस्ती या वस्त्यांमध्ये फाउंडेशनचे काम सुरु आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणारी विविध कला-कौशल्ये शिकवण्यावर भर दिला जात आहे.
मैदानी खेळ, पारंपरिक खेळ व नृत्य प्रशिक्षण, विविध स्पर्धा, मनोरंजनपर कृतीसत्र, विविध सण-समारंभ-दिनविशेष साजरे करणे, स्नेहभोजन, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी, मान्यवरांचे मार्गदर्शन व त्यांच्याशी संवाद असे निरनिराळे उपक्रम गौरीताईने मुलांसाठी आणले आहेत. मुले व पालकही या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत आणि वस्त्यांमध्ये उत्तम बदल घडतो आहे.
समाज बदलाच्या या आव्हानात्मक कार्यामध्ये गौरीताईचे यजमान विकास बोरकर हेही अविरतपणे त्यांना साथ देत आहेत. समाजभान असलेले अनेक तरुण, विविध क्षेत्रातील जाणकार-मान्यवर अभिनव विकास फाऊंडेशनच्रा माध्यमातून वंचित मुलांच्या विकासासाठी आपला वाटा देत आहेत. हे काम अनेक वस्त्यांमध्ये पोचवण्याचा गौरीताईचा प्रयत्न आहे. अथक मेहनतीने सुरु असलेले गौरीताईचे कार्य अभिमानास्पद आहेच आणि गौरीताई आणि वस्त्यांमधील मुलांचं विणलं गेलेलं जणू माय-लेकरराचं अनोखं नातं अनमोल आहे.
“अभिनव विकास फाऊंडेशनशी शंभराहून अधिक मुले जोडली गेली आहेत. त्यांचा आम्हाला लळा लागलाय. त्यांच्यातील व त्यांच्या पालकांमधील बदल पाहताना आपण करत असलेल्या कामाचे समाधान वाटते. फाऊंडेशनचे काम आता शहरी वस्त्यांबरोबरच आदिवासी भागामध्येही पोहोचवयाचे आहे.” – गौरी सोनवणे.
अधिक वाचा –
– वेहेरगावातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; एकविरा देवीच्या भाविकाचा सापडलेला मोबाईल दिला परत
– शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर
– भिर्रर्र…!! पवनमावळात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा; शिवली गावात ‘बैल पकडण्याची स्पर्धा’ उत्साहात संपन्न