पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : तिला पुढं भरपूर शिकायचं होतं… पण पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होतंय ना होतंय तोवर घरच्यांनी तिचं लग्न उरकून दिलं… सासरी ती शेतकरी कुटुंबात गेली… अतिशय साचेबद्ध विचारांच्या चौकटीत जगणारं तिचं नवं कुटुंब शेती एके शेतीच करणारं होतं… तिथं शेतीच्या कामाव्यतिरिक्त दुसरं काहीही करायला परवानगीच नव्हती… सासरचं हे चित्र पाहून ‘ग्रॅज्युएट’ झालेली ती नवविवाहिता मनोमन पार गलबलून गेली… शिक्षणानं आत्मभान आलेल्या या हुशार तरुणीची संसारात पाऊल टाकल्यापासूनच घुसमट होऊ लागली आणि घुसमट सहन करतच ती सासरच्या रितीप्रमाणे घरकाम नि शेतीकाम करत राहीली… या अस्वस्थतेच्या जगण्यात तिला गवसली तिची हक्काची लेखणी आणि या लेखणीतून उतरल्या सुंदर कविता…. ती लिहित राहिली आणि मनाला भावणाऱ्या तिच्या कवितांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला… ती कवयित्री झाली आणि आज त्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवयित्री आहेत… ही गोष्ट आहे कवयित्री कल्पना दुधाळ यांची… हरेका बाईच्या मनाला स्पर्श करुन तिचं आत्मभान जाणवणारी!!!
कल्पनाताईंचे माहेर सोलापूर जिल्ह्यातील माढा-टेंभुर्णी. बारावीनंतरच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या. एस. एन. डी. टी. महाविद्यालयात कला शाखेची पदवी पूर्ण करु लागल्या. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतानाच सन 2000 मध्ये त्यांचं लग्न झालं. पुढं शिकायचं मागे पडलं. लग्नानंतर दौंड तालुक्यातील बोरीभडक गावी स्थायिक झाल्या. सासरी शेतीचा व्यवसाय आणि एकत्र कुटुंब असल्याने भरपूर जबाबदारी आणि शेतीची कामं वाट्याला आली. ताईंचं शिक्षण झालेलं असल्यानं त्यांनी “मी कॉम्प्युटर सेंटर मध्ये शिकवू शकते किंवा स्वतःचं काही करु शकते.” अशी घरी चर्चा केली पण घरुन तत्काळ विरोध केला गेला. आपल्या घरी घरकामं आणि शेतीशिवाय दुसरं काहीच करायचं नाही असं त्यांना सांगितलं. मग, कल्पनाताई कमालीच्या अस्वस्थ झाल्या. ( navratri special abhivadan navdurgana Dainik Maval )
- सासरी सांगतील तसं त्या निमूटपणे करत राहिल्या. पुढं, लेकरांची जबाबदारी आली. या मळलेल्या चौकटीतल्या जगण्यात त्याचं अंतर्मन स्वतःचं काहीतरी करण्यासाठी सतत-सतत त्यांना साद घालत होतं. मग, कामातून वेळ मिळाला की ताई कलाकुसरीच्या वस्तू बनवायच्या पण ते पाहतानाही घरच्यांच्या नजरा वाकड्या व्हायच्या. अखेर, या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षणानं हाती दिलेलं लेखणीचं शस्त्र त्यांना मिळालं. या लेखणीतून आपोआप या त्यांच्या जगण्याच्या परिवेशातल्या कविता झरझर कागदावर उतरु लागल्या.
सन 2010 मध्ये या कवितांचा ‘सीझर कर म्हणतेय माती’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार-लेखक उत्तम कांबळे सरांनी पुढाकार घेतला. साहित्यविश्वात या काव्यसंग्रहाचे उत्स्फूर्त स्वागत झाले. त्यातून अनेक लेखकांशी त्यांचा परिचय झाला. या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कारासाठी मिळाले आणि हे सगळं पाहून घरचं चित्र किंचितसं बदललं. कल्पना काहीतरी लिहतेय, ते चागंलंच असेल एवढच घरच्यांना समजलं. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुढं, आपलं लिखाण प्रगल्भ करण्यासाठी कल्पनाताईंना भरपूर वाचन करायचं होतं. पुस्तकं घेण्यासाठी त्यांनी दागिने-साड्यांची हौस मागे ठेवली. त्या पुस्तकं मिळवत राहिल्या. ओळखीचे दादा पुण्यात आले की त्यांना त्या पुस्तकं आणायला सांगत. पुस्तकांची यादी करुन स्वतः कधी पुण्यात आल्यावर पुस्तकं खरेदी करुन जात. घरकाम आणि शेतीची काम ही जबाबदारी अखंडपणे पार पाडताना रात्री कल्पनाताई वाचनासाठी वेळ द्यायच्या. कल्पनाताईंची ही लेखनाची तळमळ आणि लेखकांनी दिलेला अभिप्राय पाहून त्यांचे पती बदलले. त्यांनी कुटुंबियांना पत्नीच्या कौतुकास्पद लेखन कौशल्याविषयी सांगितले पण कुटुंबातून नकाराचा-विरोधाचा सूर कायम राहिला.
स्वतःला सिध्द करुन स्वतःची ओळख निर्माण करायची असल्यानं कल्पनाताई लिहित राहिल्या. सन 2016 मध्ये त्यांचा ‘धग असतेच आसपास’ हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहालाही पारितोषिके मिळाली. शालेय-महाविद्यालयीन अभ्यासक्रमात ताईंच्या कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. लवकरच त्यांचे ‘जारवा’ हे पुस्तक प्रकाशित होईल. साहित्यक्षेत्रातील या भरीव कामासाठी कल्पनाताईंना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, जळगावमधून बहिणाई पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार असे सन्मान प्राप्त झाले आहेत.
कल्पनाताईंनी आपल्या लिखाणानं स्वतःची ओळख निर्माण केलीच. पण त्याबरोबर साचेबद्ध विचारांच्या त्यांच्या कुटुंबालाही कल्पनाताईंच्या लिखाणानं ओळख व सन्मान मिळवून दिलाय. याच ‘आपल्या’ कुटुंबात होत असलेली ‘आपलीच’ घुसमट त्यांनी फोडून काढली आहे आणि मोकळ्या अवकाशात स्वतःला सिध्द केलंयं. कल्पनाताईंचा हा लेखनप्रवास वाखण्याजोगा आहे.
“लेखन आणि वाचनामुळेच माझं मन खंबीर होत गेलं आणि माझ्या सासरच्या प्रतिकूल परिस्थितीला सहन करु शकले. त्यातून मार्ग काढू शकले. मी लिहित नसते तर चाकोरीतच राहिले असते. शिक्षणानं स्वातंत्र्य, समता या मूल्यांची जाणीव मला झाली होती. आता माझ्या पतीमध्येही चांगला बदल झालाय. ते पुस्तकं वाचतात, आम्ही चर्चा करतो. कार्यक्रमाना ते माझ्यासोबत येतात, मी बाहेर गेले तर मला कामात मदत करतात.” – कल्पना दुधाळ
अधिक वाचा –
– मावळ-मुळशी उपविभागात ‘इथे’ फटाके उडविण्यास बंदी, जाणून घ्या काय आहे कारण
– ‘राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी’, उद्योगमंत्र्यांनी जनरल मोटर्सच्या कामगारांना नेमके काय आश्वासन दिले? वाचा सविस्तर
– आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; ‘नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये’, आमदारांचे आवाहन