पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : आपल्या लेकीच्या अंगी असलेले कलागुण पाहून प्रगल्भ कलाकार असलेल्या बापानं आपल्या कलेचा वारसा या लेकीला दिला… वडिलांना अवगत असलेली कला जोपासणं तसं अवघड होतं. पण लेकीनही आवडीनं, मनापासून अभ्यास करुन या कलेत प्राविण्य मिळवलं आणि वडिलांच्या कलेचा वारसा पुढं नेलाय. वडिलांसारखचं उत्तमोत्तम काम करुन नावलौकिक मिळवलाय. ही आगळीवेगळी यशोगाथा आहे शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के (वय 56) यांची. रुळलेल्या पाऊलवाटांवरुन न चालता नव्या वाटेवरुन चालले पाहिजे ही शिकवण देणारं सीमाताईंचं यश तरुणींना-महिलांना दिशा देणारं आहे. ( navratri special abhivadan navdurgana Dainik Maval )
सीमाताई प्रसिद्ध दिवंगत शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या कन्या. खेडकर अप्पांना शिल्पकलेची ईश्वरी देणगी लाभली होती. पुण्यात त्यांनी प्रशस्त दालन उभारले आहे. आपल्या कारकिर्दीत अप्पांनी पाचशेहून अधिक शिल्पं साकारली. अप्पांच्या नऊ कन्यांपैकी सीमाताईंना कलेची आवड होती, त्यांची चित्रकला फार छान होती. सीमाताईंचे हे कलागुण ओळखून अप्पांनी त्यांच्यात आपला कलेचा वारसा पाहिला आणि ताईंना कलेचे शिक्षण घेण्याची दिशा दिली. दहावीनंतर सीमाताईंनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून जी. डी. आर्ट (पेंटिंग) ही पदवी पूर्ण केली. खरतरं, अभिनव मधून फाउंडेशनचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर शिल्पकलेचे शिक्षण घेण्यासाठी सीमाताईंना मुंबईला जायचे होते. परंतु, मुलीला एवढ्या लांब पाठवायला नको म्हणून त्यांनी पुण्यातूनच पदवी पूर्ण करायला सांगितलं आणि स्वतःच सीमाताईंना शिल्पकलेचे धडे दिले.
पुढं, विवाहानंतर सीमाताई दौंडला गेल्या. कलेच्या कामात खंब पडला. नंतर मुलाच्या शिक्षणासाठी त्या पुन्हा पुण्यात स्थायिक झाल्या आणि अप्पांकडे नियमितपणे शिल्पकलेचे प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली. बांधकाम व्यावसायिक असलेल्या सीमाताईंच्या यजमानांनी त्यांना फार प्रोत्साहन दिले. अप्पांकडे शिकत असताना बराच काळ तर सीमाताईंनी अप्पा कसे काम करतात याचे निरीक्षण केले, त्यातून शिल्पकलेतील बारकावे त्यांनी अभ्यासले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
असेच एकदा आता आपणही स्वतःत्रपणे शिल्प बनवूया असे ताईंना वाटले आणि 2008 मध्ये ताईंनी गुरु रामकृष्ण परमहंस यांचे फार सुंदर शिल्प साकारले. या शिल्पाची छायाचित्रे ताईंना पुण्यातील रामकृष्ण मठात दाखवली असता तिथले महाराज आनंदून गेले व त्यांनी हे शिल्प तुम्ही मठात ठेवण्यासाठी मागितले. मग, सीमाताईंनी या शिल्पावरुन फायबरचे दुसरे शिल्प बनवून मठाला देऊ केले. शिल्पकार म्हणून घडताना हे सीमाताईंनी साकारलेले हे पहिलेच शिल्प त्यांना मनस्वी आनंद, समाधान आणि पुढे सरस काम करण्याची उर्मी आणि उर्जा देऊन गेले. मग, सीमाताईं अगदी झपाट्याने काम करु लागल्या. याचवेळी ताईंनी शिल्पकलेला वाहून घेतले होते आणि अप्पांच्या कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेला होता.
- रामकृष्ण मठाकडूनच त्यांना भगवान शंकर आणि स्वामी विवेकानंद यांची शिल्प बनवण्याची मागणी आली. नंतर दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांचे पुतळे ताईंच्या हातून घडले. कुलाब्यातील संस्थेने ताईंना सन्मानित केले. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीने काम करुन सीमाताईं कलेच्या अवघड क्षेत्रात रुजल्या आणि पुढं-पुढं इथं घट्ट पाय रोवून उभ्याही राहिल्या. अप्पांच्या नावलौकिकामुळे त्या आणखी विश्वासार्ह बनल्या. अप्पासाहेबांची कन्या म्हणून ताईंनीच शिल्प साकारावे, असा आग्रह लोक धरतात.
‘हातात आलेले काम छोटं असो वा मोठं, ते प्रामाणिकपणे करायचं, आलेल्या संधीचे सोने करायचं.’ही अप्पांची शिकवण ताईंनी नेहमीच लक्षात ठेवली आहे. अप्पांचीच कार्यपद्धती आत्मसात केली आहे. कोंढवा-कात्रज येथे अप्पांनी उभारलेल्या कलादालनातच सीमाताईंची कारकिर्द घडली आहे. सध्या चार सहकारी त्यांच्यासोबत काम करतात. आजही प्रत्येक शिल्प साकारतानाचे मूळ मातीकाम ताईं स्वतः करतात. कलाकुसरीचे काम करुन शारिरीक-मानसिक थकवा आला तरी ध्यानधारणा करुन पुन्हा ताज्या होतात. आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा आपण पुढे नेत आहोत याचं ताईंना मोठं समाधान वाटतं.
गेल्या दहा सीमाताईंनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत बसशेश्वर महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या थोरांची देखणी शिल्प कुशलतेने साकारली आहेत. त्यांची उंची तीन ते बारा फुटापर्यंत आहे. ही शिल्प नांदेड, बिदर, सातारा, कोल्हापूर, विजापूर व भालकी (कर्नाटक) आंध्रप्रदेश, गुलबर्गा या ठिकाणी यातील शिल्प उभी राहून त्या -त्या परिसराचे सौंदर्य वाढवत आहेत. याबरोबरच सरदार उधम सिंग (पंजाबमध्य), साहेबराव सातारकर (खेडमध्ये), विश्नोईरत्न भजनलाल चौधरी (बिकानेर, हरियाणा व दिल्ली येथे) असे पुतळे ताईंनी घडवले आहेत.
सध्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाचे काम सुरु आहे. कलेच्या प्रांतातील शिल्पकला ही अतिशय अवघड वाटणारया कलेमध्ये ताईंनी चिकाटीने प्राविण्य मिळवून ‘शिल्पकार’ म्हणून सुंदर वाटचाल केली आहे. त्यांच्या रुपाने कलाक्षेत्रात एक आदर्श निर्माण झाला आहे.
“शिल्पकलेमध्ये अनेक संधी आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिल्पकला हा एक उत्तम पर्याय आहे. हे माध्यम मनाला आनंद देणारं आहे. महिला शिल्पकार म्हणून सारेजण अभिमानाने माझ्याकडे पाहतात याचा आनंद वाटतो. या क्षेत्रात माझे बाबाच माझे गुरु आहेत. त्यांनीच मला घडविले आहे.” – सीमा खेडकर-शिर्के
अधिक वाचा –
– यंदा गुलाल उधळायचाच..! ग्रामपंचायत निवडणूक : मावळ तालुक्यात सरपंच पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 117 अर्ज, वाचा गावनिहाय आकडेवारी
– अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पित्याच्या प्रसंगावधानाने बचावला लेक, तळेगावातील धक्कादायक घटना
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास