राज्यात सध्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. दिनांक 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर काळात उमेदवारी अर्ज दाखल होऊन 23 तारखेला छाननी पार पडली. यात वैध ठरलेले अर्जातून अर्ज माघारी घेण्याचा कार्यक्रम दिनांक 25 ऑक्टोबरपर्यंत पार पडला. बुधवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी ठिकठिकाणी अर्ज माघारीनंतर निवडणूकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. परंतू ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य होण्यासाठी पात्रता काय असतात, छाननीत अर्ज बाद होण्याची कारणे काय असतात, याची माहिती आपण लेखातून घेणार आहोत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे;
1) नामनिर्देशनपत्र सादर करण्याकरिता निश्चित करण्यात आलेल्या अंतिम दिनांकास त्या व्यक्तीचे वय 21 वर्षांपेक्षा कमी नसावे.
2) ग्रामपंचायतीच्या विद्यमान मतदार यादीमध्ये त्या व्यक्तीचे नाव समाविष्ट केलेले असावे.
3) कोणत्याही कायद्याखाली अशा व्यक्तीला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र (अनर्ह) ठरविण्यात आलेले नसावे.
4) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 13 (2) (अ) नुसार जी व्यक्ती 1 जानेवारी, 1995 रोजी वा त्यानंतर जन्मलेली असेल, अशा व्यक्तींकडे किमान शालेय शिक्षणातील 7 वी इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय निवडणूक लढविता येणार नाही.
5) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार एकापेक्षा जास्त प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते. परंतु एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवू शकत नाही.
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १०-१ अ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेवरील निवडणूक लढविण्यासाठी संबंधित व्यक्तीने नामनिर्देशनपत्राबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु, जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात पडताळणी समितीकडे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी अर्ज केलेला असेल, पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत व निवडुन आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करील, असे हमीपत्र नामनिर्देशनापत्रासोबत सादर करील. अन्यथा, मुदतीच्या आत वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यास, त्या उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असेल, असे मानण्यात येईल व ती व्यक्ती सदस्य म्हणून राहण्यास निरर्ह ठरेल.
6) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 10 नुसार स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागांवर सर्व पात्र स्त्रिया अर्ज सादर करु शकतील. परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग याप्रवर्गातून महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर त्या त्या प्रवर्गातीलच महिला आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करु शकतील.
7) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरीत झाले असल्यास त्या व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडणुकामध्ये त्या जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागातून नामनिर्देशनपत्र जरी दाखल केले असले तरी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवाराला लागू असलेल्या अपात्रतेच्या तरतुदी;
1) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1)(अ-1) नुसार एखाद्या व्यक्तीस राज्य विधानमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरविले असेल तर अपात्रतेचा कालावधी संपेपर्यंत ती व्यक्ती स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही.
2) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (अ) (एक) व कलम 14 (1) (अ) (दोन) नुसार (अ) एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यता (अपराध) अधिनियम, 1955 किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम, 1949 अन्वये दोषी ठरविले असेल व त्यानंतर पाच वर्षांचा कालावधी संपला नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल तर अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही.
3) एखाद्या व्यक्तीला इतर अपराधाबाबत न्यायालयाने दोषी ठरविले असेल व तिला 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी कारावसाची शिक्षा झाली असेल व कारावासातून मुक्त झाल्यापासून पाच वर्षांचा कालावधी संपत नसेल किंवा शासनाने त्यामध्ये सूट दिली नसेल अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही.
4) जर एखाद्या व्यक्तीला अपराधसिद्धीनंतर जामिनावर सोडले असेल परंतु तिचे अपील निकालात काढण्यासाठी प्रलंबित असेल तर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती व्यक्ती निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरेल. परंतु तिच्या अपराधसिद्धीलाही स्थगिती दिली असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते.
5) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1965 चे कलम 14 (1) (क) नुसार संबंधित व्यक्तीस सक्षम न्यायालयाने अमुक्त नादार (Provincial Insolvency Act, 1920 अन्वये) म्हणून घोषित केलेले असणे आवश्यक आहे व ज्याला अद्याप नादारीतून मुक्तता मिळाली नाही. अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही.
6) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (ब) नुसार संबंधित व्यक्तीस सक्षम न्यायालयाने विकल मनाची (Indian Lunacy Act, 1992 अन्वये) म्हणून घोषित केलेले असेल तर अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही.
7) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (ज) अन्वये एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय देशाचे नागरिकत्व मिळविले असेल किंवा कोणत्याही परकीय देशाला निष्ठा किंवा इमान देण्यास कोणत्याही कबुलीने बद्ध असेल तर ती व्यक्ती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकत नाही.
8) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (आय) नुसार एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीस ग्रामपंचायत निवडणूक लढविता येत नाही.
9) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (क-1) नुसार एखाद्या व्यक्तीने शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणतेही पद धारण केले असून तिला गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकणार नाही. तथापि, अशा व्यक्तीस जर गैरवर्तणुकीबद्दल बडतर्फ करण्यात आले असेल तर तिच्या बडतर्फीपासून पाच वर्षांचा कालावधी संपल्याशिवाय ती व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास पात्र होवू शकत नाही.
10) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (ह) नुसार एखाद्या व्यक्तीकडे ग्रामपंचायतीची/पंचायत समिती/जिल्हा परिषदेची कोणत्याही प्रकारची थकबाकी (कर व फी) देय असेल आणि ती थकबाकी देण्याविषयी कसूर करेल तर अशा व्यक्तीस निवडणूक लढविता येणार नाही.
11) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (फ) नुसार जी व्यक्ती पंचायतीच्या नियंत्रणाखाली वेतनीपद किंवा लाभाचे पद धारण करीत असेल अशी व्यक्ती असे पद धारण करीत असलेल्या मुदतीत निवडणूक लढवू शकत नाही.
12) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (ग) नुसार एखाद्या व्यक्तीने तिचा ग्रामपंचायतीच्या कामात/करारात/सेवेत स्वत: किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा हितसंबंध असेल अशी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरेल.
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (जे-1) नुसार मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अधिनियम 1995 अन्वये प्रारंभाच्या दिनांकास म्हणजेच 13 सप्टेंबर 2000 रोजी असलेल्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असली तरी अशी व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार नाही. तसेच, अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून एक वर्षांचे कालावधीत म्हणजेच 13 सप्टेंबर 2000 ते 12 सप्टेंबर 2001 या कालावधीत एकाच प्रसुतीमध्ये जन्माला आलेले एक किंवा एकापेक्षा अधिक अपत्ये ही अपात्रतेसाठी विचारात घेतली जाणार नाहीत. मात्र त्यानंतर (12 सप्टेंबर 2001 नंतर) झालेल्या अपत्यामुळे एकूण अपत्याचे संख्येत भर पडत असल्यास अशा व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते.
13 ) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (जे-2) नुसार जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आल्यास अशी व्यक्ती ग्रामपंचायतीचा सदस्य राहणार नाही.
14) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (1) (जे-3) नुसार ज्या व्यक्तीने शासकीय जमिनीवर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केलेले आहे, अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही.
15) सुलेमान अव्वास विरूद्ध प्रमोद नंदलाल यादव, 2007 (5) ऑल महाराष्ट्र लॉ रिपोर्टर 255 नुसार एका व्यक्तीस तीन मुले होती. नंतर त्यापैकी एक मूल त्याने दत्तक दिले आहे. परंतु नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी त्या व्यक्तीकडे दोन मुले असतील तर ती निवडणूक लढवू शकेल काय ? उत्तर :- नाही. दिनांक 12 सप्टेंबर, 2001 रोजी अथवा त्यानंतर व्यक्तीस तिसरे मूल झाले असेल तर त्याच दिवशी ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते. तसेच मूल जरी दत्तक दिले असले तरी त्या मुलाचे पालकत्व हे त्याच्या नैसर्गिक पालकांकडे (Biological Parents) गृहीत धरले जाते.
16 ) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) (ज-4) अन्वये राज्य निवडणूक आयोगाने राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे एखादी व्यक्ती अनर्ह असल्याचे घोषित केल्यास अशी व्यक्ती अशा आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरीता ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अनर्ह असेल अशी तरतूद आहे. उक्त तरतुदीनुसार अनर्हतेचा कालावधी संपल्यानंतर अशी व्यक्ती पुन्हा निवडणूक लढवू शकेल.
17) विद्याधर विनायक मधाने विरूद्ध महाराष्ट्र शासन आणि इतर 2004 (3) Mh LJ 328 नुसार एखाद्या व्यक्तीस भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाचा हिशेबाच्या मुद्यावरून अपात्र ठरविले असेल तर ती व्यक्ती अपात्रता आदेशाच्या कालावधीमध्ये पुन्हा निवडणूक लढवू शकणार नाही.
18) खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील शिक्षक / कर्मचारी यांना निवडणूक लढविता येते. स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी / शिक्षक यांना निवडणूक लढविता येणार नाही.
19) परकीय राष्ट्राचे नागरिकत्व संपादन केलेली व्यक्ती ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकणार नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (ज-5), मुंबई ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (दुसरी सुधारणा अधिनियम, 2010 (2010 चा महा.33) नुसार जी व्यक्ती शौचालयाचा नियमित वापर करीत असल्याबाबत ग्रामसभेच्या ठरावासोबत संबंधित पंचायतीचे प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करेल ती व्यक्ती सदस्य होण्यास / असण्यास अनर्ह ठरते.
20) एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 39 नुसार ग्रामपंचायत सदस्य पदावरून आयुक्ताने दूर केले असेल तर अशा रितीने दूर करण्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांचा कालावधी संपल्याशिवाय ती व्यक्ती निवडणूक लढविण्यास पात्र होवू शकत नाही. परंतु अशारितीने निश्चित होणारा अपात्रतेचा कालावधी हा राज्य शासन आदेशाद्वारे कमी अथवा दूर करू शकते.
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये सरपंच व सदस्यपदी निवडून येण्यासाठी आवश्यक अर्हता व निरर्हता संबंधी महत्त्वाच्या तरतुदी आपण याद्वारे जाणून घेतल्या. तसेच अधिक तरतुदी स्पष्ट करुन घेण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियमांतील तरतुदींचे वाचन करावे. तसेच ग्रामपंचायत निवडणूकीसाठी तहसिल कार्यालयातील स्थापित मदत कक्षाचीही आपण मदत घेऊ शकतात.
(Gram Panchayat Election Sarpanch Member Post Candidate Eligibility and disqualification terms conditions)
माहिती -जिल्हा निवडणूक शाखा
अधिक वाचा –
– कामशेत शहराजवळील प्रभू धाब्याजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ । Maval Crime News
– निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आंदर मावळातील पारिठेवाडी गावातील शिवकालीन महादेवी देवस्थान; पर्यटकांनाही पडतेय भुरळ
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात राजकीय पक्षांच्या नेत्यांना ‘नो एन्ट्री’, सकल मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन