पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : जोपासलेली कोणतीही कला माणसाला जीवनात बरंच काही देत असते. कलेमुळे अभ्यासात-कामात एकाग्रता वाढते, कला हे विरंगुळ्याचं उत्तम माध्यम आहे, कला हे जगण्याचं साधन आहे, कला भरपूर आनंद देते आणि ‘कलाकार’ ही वेगळी ओळख आपली कलाच निर्माण करते. कलेचं हे महत्व आणि संस्कार लहानपणापासूनच आपल्याला मिळत असतात. शालेय-महाविद्यालयीन जीवनात कला जोपासल्या जातात. परंतु, त्यानंतर कलेच्या साधनेत खंड पडतो, कला मागे राहते. पण, समीकरणाला असलेला एक अपवाद म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी आणि कथ्थक नर्तक मिलिंद रणपिसे (वय 37). नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारया सांभाळत मिलींदने केलेली शास्त्रीय नृत्यसाधना मोठी कौतुकास्पद आहेच. पण, त्याच्या या नृत्यसाधनेतून लहान-मोठ्या सर्वांनाच कला-छंद जोपासण्याची प्रेरणा निश्चित मिळते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मिलिंद वाणिज्य शाखेचा पदवीधर असून सन 2006 मध्ये तो महापालिकेमध्ये लिपिक पदावर रुजू झाला. शाळेत असल्यापासून त्याला नृत्याची आवड होतीच. पुढे शास्त्रीय नृत्याने प्रभावीत होऊन मिलिंदने अकरावीत असताना सन 2002 मध्ये कथ्थकचे शास्त्रीय प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली. तेव्हा एका मुलाला कथ्थक नृत्य शिकवण्यासाठी प्रशिक्षकांचा नकारात्मक सूर मिलिंदने अनुभवला पण जिद्द सोडली नाही, तो नृत्य शिकू लागला. पुढे-पुढे नृत्यकलेच्या क्षेत्रातच करिअर करावे या विचारात असतानाच मिलींदला महापालिकेत नोकरी लागली. घरच्या जबाबदारीमुळे नोकरीलाच प्राधान्य द्यावे लागले पण नृत्य हा जीवापाड जोपासलेला छंद असल्याने त्याने नृत्यसाधनेकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही.
दिवसभराची नोकरी आणि नंतर घरची जबाबदारी सांभाळत मिलिंदने कथ्थक नृत्याचे अध्ययन सुरु ठेवले आणि स्वतःच्या नृत्य प्रशिक्षण वर्गाद्वारे कथ्थकचे धडेही तो विद्यार्थ्यांना देत राहिला. सन 2013 मध्ये मिलिंदने भगवान गौतम बुद्धाचा जीवनपट उलगडणारी अतिशय सुंदर नृत्यनाटिका विद्यार्थ्यांसह सादर केली होती. नृत्य हा ध्यासच असल्यानं सन 2014 मध्ये संगीत विशारद पदवीही पूर्ण केली. ( Kathak dancer and Pimpri Chinchwad municipal employee Milind Ranpise Life Story )
सन 2016 मध्ये मिलिंदचा विवाह झाला. विवाहानंतरच्या कौटुंबिक जबाबदारया पार पाडतानादेखील मिलींद नृत्यसाधनेत जराही कमी पडला नाही. नोकरी करुन तो कथ्थक नृत्याचे वर्ग घेतो. सध्या तीस-पस्तीसहून अधिक विद्यार्थी मिलिंदकडे नृत्यप्रशिक्षण घेत आहेत, ही कौतुकाची गोष्ट आहे. स्वतःच्या रियाजासोबत तो आपली पत्नी संगीता आणि कन्या शांभवीलाही नृत्याचे धडे देत आहे. संगीताही आता नृत्याच्या परीक्षा देत आहेत. कन्येच्या शाळेत पालकांसाठीच्या विविध गुणदर्शन स्पर्धेत मिलिंदला पारितोषिक मिळाले ही त्याच्या कन्येसाठीही कौतुकाची गोष्ट आहे. आजवर पुणे फेस्टिव्हल, महापालिकेचा वर्धापनदिन व संगीत अकादमीचे कार्यक्रम यासह विविध सांगितीक कार्यक्रमांमध्ये मिलिंदने आपला नृत्याविष्कार सादर केला आहे. मिलिंद राहात असलेल्या सोसायटीतील सदस्यांनाही त्याच्या नृत्यसाधनेचे मोठे कौतुक आहे.
सन 2018 मध्ये beautiful dream हा अपंग व्यक्तीची स्वप्ने सांगणारा लघुपट तर 2020 मध्ये Rainbow या लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन मिलिंदने केले आहे. सध्या आणखी दोन लघुपटांच्या निर्मितीचे काम तो करत आहे तसेच संगीत अलंकार पदवीही विशेष योग्यता श्रेणी मिळवून पूर्ण करण्याचा त्याचा निश्चय आहे. दुसऱ्या बाजूला नोकरीतही मिलिंद आदर्श कर्मचारी आहे. महापालिकेत उपलेखापाल पदावर तो कार्यरत आहे. एक उत्तम कलाकार महापालिकेचा कर्मचारी आहे ही महापालिकेसाठीही अभिमानाची गोष्ट आहे. यापुढेही मिलिंदला नोकरी उत्तमरितीने पार पाडत नृत्यसाधना अखंडपणे सुरु ठेवायची आहे. विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षण देऊन शास्त्रीय नर्तक घडवायचे त्याचे ध्येय आहे.
मिलिंद म्हणतो, “मला संगीत अलंकार पदवी मिळवायची आहे. संगीत-नाट्य क्षेत्रात काम करायचे आहे. माझे कुटुंबीय तसेच कामातील सहकारीही मला नृत्यासाठी प्रोत्साहन देतात. नोकरीमुळे मला नृत्याची आवड कधीच थांबवावीशी वाटली नाही. नोकरीत चागंले काम करण्यासाठी नृत्यकलेचा उपयोग झाला आहे. नृत्य करताना ताणतणावाचा व स्वतःचाही विसर पडून आपण आनंदी राहतो.”
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून सुदुंबरेतील ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास सुरुवात
– टाकवे बुद्रुक इथे विविध आजारानुसार योग शिबिराचे आयोजन; 25 दिवस चालणार शिबिर
– सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली! लायन्स मेट्रोपॉलीसकडून 24 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप । Pavananagar