पुणे, (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : मोबाईल अनलॉक करुन जेव्हा आपण यू-ट्यूबवर शॉर्ट्स किंवा इन्स्टाग्रामवर रिल्स बघू लागतो.. तेव्हा मध्येच एक ‘मराठमोळा’ व्हिडिओ येतो.. त्यात गॉगल घातलेला एक रुबाबदार तरुण एखाद्या हॉटेलमध्ये किंवा आणखी कुठंतरी जाऊन तिथं त्यानं कशी मौजमजा केली. हे अगदी एकाच मिनिटात फार मनोरजंक पद्धतीनं दाखवतो नि सांगतो.. ते ऐकून-पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू खुलतं, माहिती मिळते अन् पुन्हा तीन-चार वेळा तरी आपण तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहात नाही. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
बघता बघता आपण त्या तरुणाचे आणि त्याच्या व्हिडिओजचे चाहते होऊन जातो. व्हिडीओमध्ये दिसणारा हा तरुण कोण? तर तो आहे प्रसिद्ध पुण्यातील ब्लॉगर आणि कन्टेन्ट क्रिएटर मनोज शिंगुस्ते (वय 32). ( Content Creator & Blogger Manoj Shinguste ) अल्पावधीतच त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. ‘Spicy kick’ या त्याच्या यूटयूब चॅनलद्वारे मनोरंजाबरोबरच ब्लॉगिंग व कंटेंट क्रिएशन या क्षेत्राची ओळख प्रेक्षकांना अतिशय सोप्या पद्धतीनं होतेय, हे महत्वाचं आहे. म्हणूनच मनोजचा प्रसिद्ध ब्लॉगर आणि कन्टेन्ट क्रिएटर बनण्यापर्यंतचा प्रवास, प्रतिनिधी संध्या नांगरे यांनी मुलाखतीद्वारे जाणून घेतलाय… (Interview with famous content creator and blogger Manoj Shinguste Daily Maval Sanvaad)
कुटुंब, बालपण आणि शिक्षण –
शिंगुस्ते कुटुंब मूळचं पैठणचं. पण, त्यांच्या पाच पिढ्या ते पुण्यातच स्थायिक आहेत. मनोजचा जन्म शहरातलाच. पिंपरीमधील रहाटणी परिसरात मनोज शिंगुस्ते राहतो. केळेवाडीतील एम. एम. विद्यालयात त्याचे शालेय शिक्षण झाले. पुढं वाणिज्य शाखेची पदवी आणि ‘एम. बी. ए.’ची पदवी त्याने पूर्ण केली. गतवर्षी मनोजचा विवाह झाला आणि आता तो बाबाही झालाय. मनोजची पत्नी निकीता त्याच्या बरोबरीने कार्यरत आहे.
अशी केली सुरूवात –
महाविद्यालयीन शिक्षणानंतर मनोजने जवळपास दहा वर्ष माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी केली. नंतर डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरु केला. त्यात चांगला जम बसवायलाही सुरूवात केली. पण पुढं तो अनपेक्षितपणेच ब्लॉगिंग व कन्टेन्ट क्रिएशन या वेगळ्या क्षेत्राकडे वळला. मनोज आणि त्याची पत्नी एकदा मोमोज खायला गेले होते. तिथे बसल्या बसल्या त्याने छोट्या व्हिडिओ क्लिप केल्या आणि त्या एकत्र करुन छोटीशी गोष्टच तयार झाली, मग ही गोष्ट त्यानं आपल्या आवाजात सांगितली आणि अगदी सहजच ती स्टोरी फेसबुकवर पोस्ट केली. या पोस्टला 400-500 लाईक्स मिळाल्या.
मग हाच प्रयोग त्याने दुसऱ्या दिवशी एका मॉल मध्ये केला व या पोस्टलाही जवळपास एक हजार लाईक्स मिळाल्या अन् इथेच मनोजने कन्टेन्ट क्रिएटर किंवा ब्लॉगर बनायचं ठरवून टाकलं. गेल्याच वर्षी ‘SpicyKick’ नावानं स्वतःचं यू-ट्यूब चॅनल सुरु केले. चॅनल सुरु केल्यानंतर प्रथम मनोजने रहाटणीतील एका पेरूविक्रत्याचा व्हिडीओ केला होता. परंतु सुरवातीला आत्मविश्वास नसल्यामुळं व्हिडीओ करत असल्याचं पेरुविक्रेत्याला न सांगता नकळतच व्हिडिओ चित्रित केला. हा व्हिडीओ एका दिवसात व्हायरल होऊन असंख्य लोकांनी पाहिला आणि अचानक पेरु विक्रेत्याकडे ग्राहक वाढले, ग्राहकांनीच विक्रेत्याला व्हिडिओ दाखवला. त्यानं आनंदून मनोजला शोधून पिशवीभर पेरु भेट दिले.
“त्यावेळी त्या पेरुविक्रेत्याच्या डोळ्यातील भाव पाहून लोकांच्या मदतीसाठी आपण असे व्हिडीओ केले पाहिजेत असं वाटलं. पुढं मी छोट्या विक्रेत्यांचे बरेच व्हिडीओ केले”, असे मनोजने आवर्जून सांगितले. पुढे, मनोजने फूड ब्लॉगिंगमध्ये पाऊल टाकले. प्रथमच एका हॉटेलमध्ये बांबूतील बिर्याणीचा छान व्हिडिओ केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याचा व्हिडीओ बनवायचा छंदच त्याचा व्यवसाय नि करिअरही बनला आहे.
अस होतं कन्टेन्ट क्रिएशन –
एक संपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी तीन दिवस लागतात. ज्यांचा व्हिडीओ बनवायचा आहे त्यांना त्यात काय हवं ? आणि आपल्याला कोणता कन्टेन्ट हवा? हे समजून घेऊन चित्रिकरण केलं जातं. त्यासाठी Spicy kick ची चार जणांची टीम सध्या आहे. चित्रिकरणानंतर मनोज आणि त्याची पत्नी निकीता शब्दांकन (Script) करतात आणि व्हिडिओला आवाज (voice over) मनोज स्वतः देतो. ते काम घरीच होतं. निकीता कॅमेरामन म्हणून उत्तमरित्या काम करतात.
- मनोजचा पुतण्या कार्तिक, त्याच्या काकासोबत उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतो. तोही आता बारक्या नावानं परिचित झालाय. एका दिवसात 3-4 लाख प्रेक्षक व्हिडिओ पाहतात, त्यामुळं शब्दांकनात आपल्याकडून एखादाही चुकीचा शब्द जाणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. फूड ब्लॉगिंगसाठी जाण्यापूर्वी तिथली गुणवत्तेविषयी अधिक माहिती मिळवूनच त्या ठिकाणची निवड केली जाते. कारण व्हिडिओवर विश्वास ठेवून असंख्य लोक तिथं जाणार असतात. तसंच एखाद्या ठिकाणी निमंत्रित करुनही पदार्थांची गुणवत्ता वा अन्य बाबी योग्य वाटल्या नाहीत, तर तो व्हिडिओ बनवण्यास स्पष्ट नकार दिला जातो, असं मनोज सांगतो. म्हणजे आपली विश्वासार्हता अबाधितच राहावी हाच Spicy kick चा कटाक्ष आहे.
‘सेल्फ हेल्थ’चा समतोल –
फूड ब्लॉगिंगकडे म्हणजे सतत बाहेरच खाऊन तब्येत बिघडू शकते. हे टाळण्यासाठी मनोज आणि त्याचे सहकारी घरुन जेऊनच चित्रिकरणाला जात असतात. तिथं व्हिडिओच्या गरजेपुरतंच खातात, त्यामुळं तब्येत व्यवस्थित राहते. तसंच हॉटेलमध्ये आवडलेले काही पदार्थ हौसेनं घरीही बनवून पाहतात.
हे करिअर होईल?
मनोजचे व्हिडिओ पाहताना साहजिकच एक प्रश्न मनात येऊन जातो की, हे छान आहे पण यातून अर्थार्जन किती होत असेल? हे व्यवसाय, करिअरचा पर्याय होऊ शकतो का? यावर मनोज म्हणतो की, कन्टेन्ट क्रिएशन किंवा ब्लॉगिंग याकडे निश्चित करिअर किंवा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून पाहता येईल. कारण कंपनीचं कोणतही उत्पादन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी चांगला कन्टेन्ट बनवणं महत्वाचं असतं. यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांसाठी कन्टेन्ट क्रिएशन करुन चांगलं अर्थार्जन करता येतं.
या क्षमता हव्यात-
उत्तम कन्टेन्ट क्रिएटर किंवा ब्लॉगर बनण्यासाठी स्वंतत्र लेखन करता येणं आवश्यकच आहे. लिखाणाचा पाया पक्का असेल तर पुढच्या गोष्टी जमून जातात आणि प्रेक्षकांना काय आवडेल व त्यानुसार आपण कसा कन्टेन्ट निर्माण करायचा, हे हेही समजलं पाहिजे, असं मनोज सांगतो.
आजवरची कामगिरी –
आजवर मनोजने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक हॉटेल्समध्ये तसचं उद्यानं, बाजार, काही पाहण्याजोगी ठिकाणं अशा जवळपास ठिकाणांना भेट देऊन व्हिडीओ बनवले आहेत आणि यू ट्यूब-फेसबुक-इन्टाग्रामवर हे आपलं सुंदर शैलीदार कन्टेन्ट क्रिएशने मांडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शाळेत असताना इंग्रजी हा मनोजचा आवडता विषय होता. मराठी विषय त्याला अवघड जायचा. पण, आत्ताचं त्याचं मराठी लेखन हरेक मनाला आपलसं वाटत आहे. या मराठमोळ्या शब्दांकनाचं सादरीकरण तितकंच प्रभावी आहे, गुणवत्तापूर्ण आहे आणि म्हणूनच मनोज एक प्रसिद्ध कन्टेन्ट क्रिएटर व ब्लॉगर बनला आहे. या क्षेत्रातील भरारीसाठी त्याला रेडिओ सिटीचा Influencer Of the Year, एका हॉटेलकडून Food Blogger of the Year अशा पुरस्कारांनी गौरविलं आहे.
अशी असेल पुढची वाटचाल –
भविष्यात सबंध महाराष्ट्रात खाद्यभ्रमंती करुन विविध भागांमधील निरनिराळ्या पदार्थांची ओळख राज्यातील प्रेक्षकांना-खवय्यांना छानशा व्हिडीओतून करुन द्यायची. सोबतच इतर विविध विषयांवरचेही नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवायचे, हाच मनोजचा निश्चय आहे. येणाऱ्या काळात एक मिनिटाच्या व्हिडिओबरोबरच मोठे व्हिडिओ बनवले जाणार आहेत व त्यात चाहत्यांना आवडत्या कॅमेरामन व बारक्याचा आवाजही कदाचित ऐकायला मिळेल.
व्हिडिओतील श्वानांविषयी –
Spicy kick च्या बहुतेक व्हिडिओ अखेरीस रस्त्यावरील श्वान दिसतात. मनोज नेहमीच या श्वानांसाठी वेगवगळा खाऊ घेऊन जातो. हे श्वानप्रेमही लोकांना फार आवडतयं व श्वान कन्टेन्टचा जणू अविभाज्य घटकच झालेत.
“मराठी आपली मायबोली आहे. मराठीतील शब्दांची ताकद दुसऱ्या भाषेत नाही. म्हणूनच मराठीतून ‘कन्टेन्ट क्रिएशन’ करताना वेगळाच आनंद मिळतो आणि ते पाहणं-ऐकणं आपलेपणाचं वाटतं. तरुणांना कन्टेन्ट क्रिएशन वा ब्लॉगिंग क्षेत्रात उत्तम करिअर करता येईल. या क्षेत्रात काम करताना माझी वेगळी ओळख निर्माण झाली आहे आणि माझ्यात आत्मविश्वास आला आहे.” – मनोज शिंगुस्ते
अधिक वाचा –
– ‘सारथी’ संस्थेमार्फत राज्यातील तब्बल 47 गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहिम, 8 हजार 586 विद्यार्थ्यांचा सहभाग
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना
– आण्णांचा आप्पांना विरोध! मावळ लोकसभेत नेमकं चाललंय काय? विद्यमान लोकप्रतिनिधींच्या भूमिकांची राज्यभर चर्चा । Maval Lok Sabha Election 2024