तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. परंतू पोलिसांकडून त्यांचा तातडीने तपासही लावला जात आहे. आताही तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने डिसेंबर 2023 च्या एका वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल करत असताना चोरीला गेलेल्या एक दोन नाही तर तब्बल 19 दुचाकींचा शोध घेतला आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (दि. 5 मार्च) तळेगाव दाभाडे पोलिसांकडून या तपास कार्याची माहिती माध्यमांना देण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये 4 डिसेंबर 2023 च्या दिवशी गुन्हा रजि.नं. 612/2023 नुसार भा.द.वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या वाहनाचा आणि अज्ञात आरोपीचा पोलिस शोध घेत होते. या तपासादरम्यान तपास पथकातील पोलीस शिपाई हर्षद कदम यांना गुप्त बातमीदारामार्फत, सदर गुन्ह्यात चोरीला गेलेले वाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक (तळेगाव दाभाडे) या ठिकाणी उभे असल्याची माहिती मिळाली. ह्या माहितीनुसार तत्काळ तिथे जात पोउपनि रविंद्र खामगळ आणि पोहवा कोकतरे यांवी तिथे उभ्या असलेल्या दुचाकी वाहनाबाबत आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा ते दुचाकी वाहन उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे याने तिथे उभे केल्याचे समजले. ( talegaon dabhade police successfully investigated two-wheeler theft crime 19 bikes confiscated accused arrested )
पोलिसांनी लगेचच त्या व्यक्तीची माहिती काढून घेतली आणि त्याला मारूती मंदिर चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने कबूली दिली आणि तळेगाव दाभाडे गावच्या हद्दीतून इतरही दुचाकी वाहने चोरल्याचे सांगितले. तसेच ती वाहने साथीदार लालु सखाराम मेंगाळ (रा. कॉलनी वाडी इंदोरे, ता. इगतपुरी) याच्या मदतीने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि पालघर जिल्हयातील मोखाडा या भागात विक्री केल्याचीही कबुली दिली.
या माहितीवरून पोलिसांनी सदर पोस्टे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच आरोपीच्या कबुलीनुसार तळेगाव दाभाडे आणि परिसरातील चोरी गेलेल्या अन्य वाहनांच्या जप्तीसाठी थेट नाशिक आणि पालघर गाठले. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी पोउपनि खामगळ आणि अंमलदार यांनी आरोपीने सांगितलेल्या दोन्ही ठिकाणी जाऊन इगतपुरी येथुन 10, मोखाडा येथुन 4 तसेच तळेगाव दाभाडे गावच्या हद्दीतुन 5 याप्रमाणे एकुण 19 दुचाकी वाहने जप्त केली. ह्या सर्व दुचाकी वाहनांची अंदाजे किंमत 4,75,000 रुपये आहे.
आरोपी उदयराज उर्फ कपिल निवृत्ती डमाळे (वय 40, रा. तळेगाव दाभाडे) याने सांगितलेल्या ठिकाणांवरून वरील दुचाकी जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे. सदर कार्यवाही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त देहरोड विभाग देवीदास घेवारे, तळेगाव दाभाडे पोस्टे वपोनि किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख पोउपनि रविंद्र खामगळ, स.फौ. कदम, पोहवा कोकतरे, पोशि कदम, सगर, ओव्हाळ, मोहीते, झेंडे, मदने यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– पवनमावळ विभागातील घारखेल माथा ते आढले-पुसाणे रस्त्यासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी उपलब्ध; रस्त्याचे भूमिपूजनही संपन्न
– सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम