विविध शासकीय संस्था आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन वडगाव मावळ वन विभागाच्या वतीने विविध प्रजातींच्या सुमारे 2 लाख रोपांची सवलतीच्या दरात विक्री करण्यात येत असल्याची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी दिली. पारवडी येथील मध्यवर्ती रोप वाटिकेत विविध प्रजातींची रोपे तयार करण्यात आली आहेत. 9 महिने कालावधीची लहान पिशवीतील 1 लाख आणि 18 महिने कालावधीची मोठी 1 लाख अशी एकूण 2 लाख रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी ही माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ योजना –
केंद्र शासनाच्या “एक पेड माँ के नाम – Plant4Mother” योजनेची पूर्तता व्हावी तसेच राज्याने यापूर्वी अवलंबिलेले वृक्ष लागवडीचे धोरण अखंडपणे पुढेही चालू राहावे आणि या कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामुहिक पडीक क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा तसेच सर्वसामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना माफक दरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षात वन महोत्सवाच्या कालावधीत “अमृतवृक्ष आपल्या दारी” योजना राबविण्याच्या उद्देशाने सवलतीच्या दरात ही रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत.
पुढील लहान मोठी रोपे उपलब्ध –
लहान पिशवीतील रोपांमध्ये वावळा 15 हजार करंज, आवळा, बांबू, खैर या प्रजातींची प्रत्येकी 10 हजार, सीताफळ, शिवण, बेहडा, चिंच, जांभूळ, महाडूक, आपटा व शिसू या प्रजातींची प्रत्येकी 5 हजार, मोहगणी व बहावा या प्रजातींची प्रत्येकी 3 हजार तसेच बेल आणि रक्तचंदन या प्रजातींची प्रत्येकी 2 हजार रोपे उपलब्ध आहेत.
मोठ्या रोपांमध्ये आवळा 12 हजार, करंज, सिसम, बांबू व या प्रजातींची प्रत्येकी 10 हजार, वावळा 8000, चिंच 7000, बेहडा 6000, ऐन, महाडूक, साग व मेडशिंग या प्रजातींची प्रत्येकी 5000, वड व पिंपळ या प्रजातींची प्रत्येकी 2500, आपटा 2200, सीताफळ व मोह या प्रजातींची प्रत्येकी 2000, आंबा आणि शिवन या प्रजातींची प्रत्येकी 1000, मोहगणी 800 तसेच फणस व रिठा या प्रजातींची प्रत्येकी 500 रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सामान्यांसाठी माफक दरात रोपे उपलब्ध –
लहान रोपे 21 रुपये व मोठी (उंच) रोपे 53 रुपये या प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. पारवडी येथील मध्यवर्ती रोप वाटिकेत येत्या 30 सप्टेंबरपर्यंत दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही रोपे मिळतील. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन येत्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांनी केले आहे. ( On behalf of Vadgaon Maval Forest Department sale of saplings of various species has started )
अधिक वाचा –
– मोठा निर्णय ! पांढरे रेशनकार्ड धारकांनाही मिळणार महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेचा लाभ
– वडगाव येथे भीषण अपघात, स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर दुकानात घुसला, महिला ठार बालके जखमी
– खंडाळा एक्झिट ते वलवण एक्झिट दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश