वनविभाग मावळ यांच्याकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. संरक्षित वन्यप्राण्याची शिकार करून मांस शिजवून खाणाऱ्या चार जणांना वनविभागाने ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. बुधवार (दिनांक 19 जून) रोजी मौजे मळवंडी ठुले येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 19) प्राप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ आणि कर्मचारी यांनी मौजे मळवंडी ठुले येथे धाड टाकली. यावेळी तिथे संरक्षित भेकर प्रजातींच्या वन्य प्राण्याचे (शेड्युल 1) शिजवलेले मांस आढळून आले. अधिकाऱ्यांनी 1) दिनेश ज्ञानेश्वर ठुले (रा. मळवंडी ठुले) 2) गंगाराम धोंडीबा आखाडे (रा. मळवंडी ठुले) 3) सुनील ठोकू कोकरे (रा. मळवंडी ठुले) आणि एक अल्पवयीन यांना शिजवलेले मांस आणि एक दुचाकी, मानवी बनावटीच्या 2 बंदुका, 1 कोयता, 1 भाला, 1 काडतूस, छरा, गॅस सिलेंडर, शेगडी या हत्यार चीजवस्तूंसह ताब्यात घेतले.
चारही शिकारी आरोपींविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आणि भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये वन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपी 1 ते 3 यांना 6 जुलै 2024 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपी क्र. 4 याला बाल विधी मंडळ येरवडा यांनी समुपदेशनासाठी एका संस्थेकडे पाठवले आहे. तसेच संशयित मुख्य आरोपी सचिन अशोक तोंडे (रा. मळवंडी ठुले) हा फरार असून वन विभागाचे पथक त्याचा शोध घेत आहे.
मुख्य वनसंरक्षक (प्रा.) एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक (प्रा.) महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ हनुमंत जाधव, वनपरिमंडळ अधिकारी दया डोमे, आशा मुंढे, वनरक्षक साईनाथ खटके, वनरक्षक संदिप अरूण, इतर वनरक्षक आणि वनसेवक बबन शिंदे, विशाल सुतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ; वाचा योजनेची उद्दिष्ट्ये, वैशिष्ट्ये आणि जोखमीच्या बाबी
– खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ ! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
– इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक