मावळ तालुक्यातील पवना धरणातून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पिंपरी-चिंचवड शहाराला पाणीपुरवठा करण्याची योजना तत्कालीन सरकारने जाहीर केली. त्याविरोधात मावळ तालुक्यातील स्थानिक शेतकरी कष्टकरी आणि सामान्य नागरिकांचा जनक्षोभ उसळला. बंदिस्त पाईपलाईन योजनेला तीव्र विरोध झाला. तरीही सरकारने योजना रेटून नेण्याचे आणि पूर्ण करण्याचे धोरण स्विकारले, अखेर तालुक्यातील तेव्हाच्या स्थानिक नेत्यांनी एकी करत बंद पाईपलाईन योजनेविरोधात लढा उभा केला आणि त्यातूनच 9 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आंदोलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी बऊर येथे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे अडवून आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी बळ वापरून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या अमानुष गोळीबारात तीन स्थानिक शेतकरी बळी पडले. या शहीदांचे आज येळसे येथे स्मारक उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विरोध पाहता ही योजना सरकारने स्थगिती केली, परंतु अद्याप ती रद्द करण्यात आलेली नाही. परंतु दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांती दिनी येळसेतील शहीद शेतकऱ्यांच्या स्मृतीस्थळावर नागरिक, प्रतिनिधी, नेते गोळा होतात आणि शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात. शुक्रवारी देखील मावळ गोरीबार प्रकरणाला 13 वर्षे पूर्ण होत असताना येळसेतील स्मृतीस्थळी शहीद शेतकरी कांताबाई ठाकर, शामराव तुपे आणि मोरेश्वर साठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेकजण उपस्थित झाले होते. सकाळी बऊर येथून प्राणज्योत आणून येळसे येथील स्मृतिस्थळावर 12 वाजून 40 मिनिटांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. परंतु यावेळी तालुक्यातील ‘गलिच्छ’ राजकारण दिसून आले.
स्मृतीस्थळावर हमरीतुमरी –
मागील 12 वर्षांपासून मावळ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष एकत्र येत शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहतात. परंतु, या शुक्रवारी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्ष यांच्याकडून स्वतंत्र श्रद्धांजलीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना (उबाठा) आणि भाजपा सह इतर पक्षाच्या नेत्यांनी दोन ठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित केल्याचे दिसताच तणाव निर्माण झाला. यातून आजी – माजी आमदार यांच्या बद्दल घोषणाबाजी झाल्याने काही वाद निर्माण झाला. स्थानिक शेतकऱ्यांच्या मध्यस्थीनंतर तो वाद सोडविण्यात आला, परंतु क्रांती दिनी राजकारणी भिडल्याचे चित्र सर्वांनी पाहिले.
आजी-माजी आमदारांना विसर –
स्मृती स्थळावर श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला दरवर्षी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आवर्जून उपस्थित असतात. परंतु, यंदा प्रथमच तालुक्यातील आजी-माजी आमदार शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृतीस्थळावर आले नाहीत. त्यामुळे या जनप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा झाली. विद्यमान आमदार सुनिल शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांना शहीद शेतकऱ्यांचा विसर पडला आहे का? अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू होती. तर फक्त राजकारण साधेल तिथेच जायचे, असे काही आहे का? असा संतप्त सवालही नागरिक विचारत आहेत.
ठाकरेंच्या पक्षातील गटबाजी समोर –
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभारण्यात शिवसेना पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. सध्या शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. तालुक्यात दोन्ही सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. परंतु, क्रांती दिनी शहीदांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील गटबाजी देखील सर्वांना दिसून आली. या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दोन स्वतंत्र ठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम केले.
अधिक वाचा –
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप
– माळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन, आमदार शेळकेंच्या माध्यमातून 30 लाखांचा निधी
– तळेगाव शहरातील महिलांसाठी सुवर्णसंधी ! ‘या’ दोन ठिकाणी मोफत शिवणकाम, आरी वर्क, फॅशन डिझायनिंग क्लासेस सुरू