Dainik Maval News : देहू नगरपंचायतीने नगरपंचायत हद्दीत मिळकत कराची शंभर टक्के वसुली करण्याचा संकल्प केला आहे. असे असतानाही 31 मार्चपूर्वी 74 टक्के थकबाकी वसुलीचे आव्हान देखील नगरपंचायतीपुढे आहे.
त्यामुळे आता नगरपंचायत एक्शन मोडमध्ये आली असून मोठ्या थकबाकीदारातील सुमारे 400 जणांना नगरपंचायतीने नोटीस बजावली आहे. तसेच जर थकबाकीदारांनी वेळेत कर न भरल्यास, नवीन वर्षामध्ये वसुलीसाठी थकबाकीदारांच्या दारावर ढोल वाजविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निविदा घार्गे यांनी दिली.
देहू नगरपंचायत हद्दीमध्ये सुमारे 13 हजार 982 मिळकत धारकांच्या नोंदी आहेत. यातून नगररपंचायतीचा एकूण मिळकत कर सुमारे 14 कोटी 30 लाख 57 हजार 916 रुपये इतका आहे. यातील चालू आर्थिक वर्षाचा कर हा 6 कोटी 78 लाख 41 हजार 58 रुपये असून तब्बल 7 कोटी 52 लाख 16 हजार 858 रुपये इतकी थकबाकी आहे.
नगरपंचायतीने 30 नोव्हेंबर अखेर संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकर धारकांसाठी 1 टक्का सवलत, तर 50 गृहोपयोगी वस्तू लकी ड्रॉ द्वारे देण्याचे 1 हजार मिळकत कर धारकांना कुपन देण्यात आले आहे. हे लकी ड्रॉ कुपन 26 जानेवारी रोजी नागरिकांसमोर पारदर्शकपणे काढण्यात येऊन वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान चालू आर्थिक वर्षातील 1 कोटी 79 लाख 5 हजार 471 रुपये कर आणि थकबाकीतील 1 कोटी 92 लाख 20 हजार 710 रुपये मिळकत कर धारकांनी कर जमा केला आहे. याचा अर्थ अद्यापही उर्वरित 74 टक्के कर थकबाकी वसुलीचे आव्हान नगरपंचायतीपुढे आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवनानगर येथील व्याख्यानात वसंत हंकारे यांच्याकडून ‘बाप समजावून घेताना’ हजारो विद्यार्थ्यांना भावना अनावर । Pavananagar
– पवना धरणात 2 युवक बुडाल्याचे प्रकरण : बंगला मालकासह नाव मालकाविरुद्ध गुन्हा दाखल । Pavana Dam News
– मावळ तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविले जाणार । Maval News