Dainik Maval News : “कलाकाराला वय असते, परंतु कलेला वय नसते, ती चिरंजीव असते. समाजाच्या निकोप वाढीसाठी, स्वास्थ्यासाठी कलांची समृद्धी आवश्यक आहे. म्हणून कलाकारांचे अत्यंत महत्त्व आहे. आपण फक्त रंगभूमीवरील कलावंतांना पहातो व त्यांनाच मान देतो. तथापि पडद्याआड राहून काम करणाऱ्या कलाकाराचे महत्त्व सुद्धा तेवढेच असून त्या सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. साहित्यिक, कलाकार यांचे त्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या सर्वांना पुरेसे मानधन राज्य शासनाने द्यावे यासाठी मी प्रयत्न करेन,” असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मावळ शाखा आयोजित मावळ तालुका साहित्यिक व कलाकार मेळाव्यामध्ये उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. आमदार शेळके पुढे म्हणाले, तळेगावात आधुनिक नाट्यगृह असावे ही दीर्घकालीन मागणी प्रलंबित आहे. या संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे खंबीर पाठपुरावा करून जे जे करणे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न मी निश्चित करेन.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, तळेगावातील सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम होत असतात. तसाच विचार केला तर तळेगाव ही पुणे जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानीच म्हणावी लागेल. मावळातून सुमारे २०० साहित्यिक व कलाकार या मेळाव्यास उपस्थित होते. प्रा. अशोक जाधव, डॉ. मिलिंद निकम यांनी सूत्रसंचलन केले. मेळावा यशस्वी होण्यासाठी नाट्यपरिषदेचे भूषण गायकवाड, नयना डोळस, संजय वाडेकर, स्वानंद आगाशे, तानाजी मराठे, संकेत खळदे, नितीन शहा, मंजूश्री बारणे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी व्यासपीठावर मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद मावळ अध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बाबा पाटील, कलावंत मानधन समितीचे सदस्य कौस्तुभ कुलकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके, नाट्यपरिषद कार्याध्यक्ष गणेश काकडे, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, रंगकर्मी विश्वास देशपांडे, राजेश बारणे, अतुल पवार, संजय वाडेकर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’