Dainik Maval News : पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
- दरम्यान, राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, या निर्णयाचे मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेने स्वागत केले आहे. यामुळे पोल्ट्रीसह इतर पशुसंवर्धन व्यवसायाला मोठा आधार मिळणार असून तो शेतकरी व पशुपालकांच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी व्यक्त केले.
पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्याच्या निर्णयाची पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत नुकतीच घोषणा केली. पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे ७६.४१ लक्ष पशुपालक कुटुंबांना होईल. या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे ७,७०० कोटी रुपये इतकी वाढ अभिप्रेत आहे, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले,
महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याने पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा दिला आहे. यामुळे पोल्ट्री व्यवसायासही कृषी क्षेत्रातील सवलतींचा लाभ मिळणार असून, यामध्ये वीज दर आकारणी कृषी दराप्रमाणे, ग्रामपंचायत करामध्ये सवलत, कर्जावरील व्याजदरात सवलत तसेच सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी अनुदान यांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायास नवा श्वास मिळेल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि पशुपालकांचे आर्थिक बळकटीकरण होईल, असेही गाडे यांनी नमूद केले. यावेळी संघटनेचे सचिव सोनबा गोपाळे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवले जात आहे, ही गोष्ट उत्साहवर्धक आहे.”
कार्याध्यक्ष सुभाष केदारी म्हणाले, “पोल्ट्री व्यवसायास कृषी दर्जा मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.” संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अनिल खामकर व सचिव विलास साळवी यांनी संघटितपणे दिलेल्या लढ्याबद्दल मावळ तालुका संघटनेने आभार व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सोमाटणे, वरसोली येथील टोलनाके बंद होणार नाही? सरकारच्या उत्तरामुळे नागरिकांमध्ये मोठी निराशा, आमदार शेळकेंच्या प्रश्नामुळे वास्तव उघड
– पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर
– तळेगाव-चाकण रस्त्याची दूरवस्था ; आमदार सुनील शेळके प्रचंड आक्रमक, तातडीने खड्डे बुजविण्याची सरकारकडे मागणी