Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना भाजपाच्या पदाधिकाऱ्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. परंतु आमदार शेळकेंच्या या खेळीनंतर मावळातील राजकारणात पुन्हा रंग चढला असून भाजपाचे नेतेही मैदानात उतरले आहेत. तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याची परिस्थिती निर्माण होत आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजपाचे माजी शहराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील हेच उमेदवार असावेत आणि त्यांना पूर्ण पाठिंबा राहील, असे जाहीर करत आमदार सुनील शेळके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी आम्ही दोन पावले मागे येण्यासही तयार आहोत,” असे विधान करून त्यांनी संतोष दाभाडे यांना स्पष्ट पाठिंबा दिला.
दरम्यान आमदार शेळके यांच्या या विधानानंतर भाजपाच्या गोटात खळबळ माजली असून तातडीने भाजपाचे नेतेही समोर येऊन यावर बोलू लागले आहेत. भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रवी भेगडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत, आमदार शेळके यांनी महायुती म्हणून पुढे जाण्याची भुमिका घेतली, त्याचे स्वागत, परंतु भाजपाचा उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आमदारांना नसून त्यांनी ती जबाबदारी घेऊ नये असे म्हटले आहे.
दरम्यान, मावळ भाजपातील प्रमुख नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही तातडीने यावर पत्रकार परिषद घेऊन आपली व पक्षाची भुमिका स्पष्ट केली. भाजपात उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया आहे, त्यानुसार उमेदवारी जाहीर होते. आमदारांनी यात लक्ष घालू नये. महायुती म्हणून जे निर्णय घ्यायचे, त्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
एकंदरीत आमदार सुनील शेळके यांनी संतोष दाभाडे यांना उमेदवारी जाहीर करुन मोठी राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. एकूणच मावळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मोठी राजकीय चढाओढ पाहायला मिळेल, यात शंका नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख