Dainik Maval News : खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून व आपला मावळा व नीलेश लंके प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या गडकोट किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेअंतर्गत जुलै महिन्यामध्ये मावळमधील तिकोणा किल्ल्याचे संवर्धन तसेच स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. रविवार, दिनांक २७ जुलै रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकारणापेक्षाही सामाजिक कामांवर भर देणाऱ्या खासदार नीलेश लंके यांनी १० मार्च रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्यासाठी, त्यांच्या प्रेरणादायी गट-कोट किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी गटकोट किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिम राबविण्याची घोषणा केली होती.
मार्च महिन्यात १६ मार्च रोजी शिवजन्मभूमी शिवनेरी येथून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर श्रीगोंदे तालुक्यातील धर्मवीर गड, मे महिन्यात भोर येथील रायरेश्वर गड, जुन महिन्यात नाशिक जिल्ह्यातील रामशेज येथे गडाचे संवर्धन व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती. तर जुलै महिन्यात मावळमधील तिकोणा किल्ल्याची निवड करण्यात आली आहे.
स्वयंसेवकांसाठी सुविधा – मोहिमेत सहभागी होणाऱ्या नोंदणीकृत मावळयांसाठी वाहनांची, जेवण नास्ता तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी सात वाजता खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेस सुरूवात होणार आहे.
मोहिमेचा उद्देश – शिवकालीन गडकोटांची स्वच्छता, संवर्धन, पर्यावरणसंवर्धन आणि इतिहास जतनासाठी एक सशक्त मोहिम खा. लंके यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा उद्देश ऐतिहासिक वारशाचे संरक्षण, पर्यावरणाची जपवणूक आणि जनजागृती साधणे हा आहे.
आ. शशिकांत शिंदेंचा सहभाग – खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमांमध्ये आजवर राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सहभाग नोंदविला आहे. तिकोणा किल्ला संवर्धनाच्या मोहिमेमध्ये आता नव्याने प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले आमदार शशिकांत शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.
तरूण पिढीला इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न – शिवरायांचे किल्ले हे आपली अभिमानाची प्रतीके आहेत. फक्त फोटो काढून गड पाहणं नव्हे तर त्या गडासाठी श्रमदान करणं, त्याचा इतिहास जपणं हे आपलं कर्तव्य आहे. या मोहिमेतून तरूण पिढीला इतिहासाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख