Dainik Maval News : पवन मावळातील तीस ते चाळीस गावांसाठी प्राथमिक बाजारपेठ असलेल्या पवनानगर बाजारपेठ चौकात मोठमोठे खड्डे पडले असून मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या संपूर्ण पावसाळ्यात ह्या रस्त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली असून सद्य स्थितीत रस्ता हा रस्ता नसून खड्ड्यांची मालिका बनला आहे.
पवनानगर हे ठिकाण म्हणजे पवन मावळातील मध्यवर्ती केंद्र आहे. दवाखाना, बाजारपेठ, बँका, तलाठी – मंडल कार्यालये, पोस्ट ऑफिस आदी महत्वाच्या सोयी सुविधांसाठी पवन मावळ पश्चिम भागातील नागरिक नित्याने याठिकाणी येत असतात. सोबत शाळा महाविद्यालयांत शिकणारे विद्यार्थी, भाजीपाला विक्रेते शेतकरी, दुग्ध व्यावसायिक व कामगार वर्ग यांच्यासाठीही पवनानगर हे मध्यवर्ती केंद्र आहे. अशावेळी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील जीवघेणे खड्डे हे या सर्वांसाठीच जणू काळ होऊन बनले आहेत.
फूट दीड फुटांचे भलेमोठे खड्डे, त्यातही वाहतुकीची वर्दळ, अवजड वाहनांची होणारी सततची ये-जा, बेफिकीर वाहन चालकांकडून अशाही परिस्थितीत जोराने गाडी हाकणे यांमुळे सर्वसाधारण प्रवासी, नागरिक, वाहनचालक व पादचारी यांच्यासाठी अपघाताचे कारण कसे ठरेल, हे कुणीही सांगू शकत नाही. खड्डे आणि सतत साचलेले पाणी यांमुळे रस्त्याच्या कडेला असणारे व्यापारी देखील हैराण आहेत, एकूणच ह्या जीवघेण्या खड्ड्यांवर किमान तात्पुरती तरी खड्डी – दगड टाकून खड्डे भरावेत, अशी तीव्र मागणी होत आहे.
प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष :
ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे भरणे व रस्ता वाहतुकीस सुयोग्य करणे आवश्यक आहे, त्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे या स्थितीकडे सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. एखादा मोठा अपघात झाल्या शिवाय अन् सामान्य नागरिकांच्या जीवाची हानी झाल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक नेते, कार्यकर्त्यांचेही दुर्लक्ष :
पावसाळ्याच्या सुरुवातीला ह्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे स्थानिक नेत्यांनी लक्ष वेधले होते. परंतु त्यानंतर येथे खड्डे भरण्याच्या नावाखाली मुरुम टाकण्यात आला. परंतु जोरदार पावसाने चार दिवसात चिखल होऊन मुरुम वाहुन गेला. त्यानंतर आता महिना दीड महिन्या पुन्हा पहिल्यापेक्षा मोठे खड्डे पडले आहेत, अशात या रस्त्याकडे स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनीही दुर्लक्ष केल्याचे भासत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News
