Dainik Maval News : पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिरूर-चाकण-तळेगाव-कर्जत-उरण या कागदावरील नव्या मार्गाला गती मिळण्याची शक्यता आहे. या मार्गासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
शिक्रापूर-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्गालगत असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी असते. त्यामुळे हा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित मार्गामुळे मराठवाड्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाण्यासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
या मार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली होती. त्यामध्ये त्यांनी यासंदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
सध्या मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागते. चाकण आणि शिरूर येथील ‘एमआयडीसी’मुळे अहिल्यानगर रस्त्यावर मोठी गर्दी असते. अवजड वाहनांसाठी हाच एकमेव रस्ता आहे. त्यामुळे हा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
असा असणार रस्ता :
‘मल्टिनोडल काॅरिडाॅर’ म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून तो चार पदरी असणार आहे. त्याची एकूण लांबी १३५ किलोमीटर एवढी असून, त्यासाठी बारा हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शिरूर-पाबळ-राजगुरूनगर-शिरवली मार्गे पाईट-वांद्रे-कर्जत असा सुमारे १३५ किलोमीटरचा मार्ग, कर्जत मार्ग पुढे पनवेल-उरणला जोडला जाणार. या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच