दैनिक मावळ विशेष, संपादकीय लेख : श्री विशाल कुंभार :: स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मावळ तालुक्यातील ज्या वाडीवस्तीवर, गावात वीज पोहोचली नव्हती, तिथे 2019 नंतर प्रथमच वीज पोहोचली. ज्या वाडीवस्तीवर जायला रस्ता नव्हता, चिखलमातीचा रस्ता तुडवीत नागरिकांना जावे लागे, तिथे सिमेंटचा पक्का रस्ता झाला. पिण्याच्या पाण्यासाठी ज्या महिलाभगिनींना कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागायची, अशा हजारो महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम झाले. मावळ तालुक्याच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा, अध्यात्मिक – सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रांत प्रगतीचे नवीन वारे वाहू लागले आहे. मावळ तालुक्यात विकासाचा रथ जोमाने धावू लागलाय आणि ह्या रथाचे सारथ्य करीत आहेत, मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार श्री सुनील शंकरराव शेळके.
शेळके कुटुंबाला असलेला जनसेवेचा वारसा सुनील शेळके यांनी तरूण वयात स्वीकारला आणि लोकसेवेचा वसा घेऊन समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. पक्षीय कार्यकर्ता ते लोकनेता अशी वाटचाल आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. नगरसेवक ते दोन टर्मचे आमदार आणि भविष्यात कदाचित मंत्रिपदाची माळही आमदार सुनील शेळके यांच्या गळ्यात पडेल. परंतु हे सर्व होत असताना प्रत्येक दिवस जनतेत मिसळणारा, त्यांच्या सुख दुःखात सामील होणारा, प्रत्येक अडचणीच्या सोडवणुकीसाठी राबणारा नेता नव्हे कार्यकर्ता बनून आमदार सुनील शेळके मावळ तालुक्यात काम करीत आहेत. त्यामुळेच जनसेवेत स्वतःला झोकून दिलेल्या या लोकप्रतिनीधीला मावळची जनता आता जनसेवक म्हणून संबोधत आहे.
आपल्या कामातून आमदार सुनील शेळके यांनी त्यांना लावल्या जाणाऱ्या – कार्यक्षम, कार्यसम्राट, जनसेवक, लोकनेता ह्या बिरुदावल्या सार्थ ठरविल्या आहेत. आमदार सुनील शेळके हे आता 46 वर्षांचे होत आहेत. परंतु अगदी कमी काळात त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतलेली दिसते. परंतु ही झेप घेण्यासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी, दृढ इच्छाशक्ती आणि सु नीती ही आमदार शेळकेंजवळ आहे, त्यामुळे आज केवळ मावळ तालुक्यात नाही, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा आहे. सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांचे विश्वासू आमदार अशी संपूर्ण राज्यात आमदार शेळके यांची ओळख आहे. आमदार शेळके यांना अल्प काळात मिळालेले हे राजकीय यश त्यांच्या अभ्यासू आणि चाणाक्षपणाची झलक आहे.
मावळ तालुका हा दऱ्या खोऱ्याचा तालुका. एकीकडे ग्रामीण भाग दुसरीकडे शहरी भाग. त्यामुळे प्रत्येक भागातील समस्या वेगळ्या आणि प्रत्येक भागातील नागरिकांच्या भविष्यासाठीच्या गरजा वेगळ्या. परंतु संपूर्ण मावळ तालुक्याचा अभ्यास करून मावळच्या भविष्याच्या विचारातून एक निश्चित ध्येय धोरण घेऊन आमदार सुनील शेळके वाटचाल करीत आहेत. याकामी केवळ स्वकीयांना नाही तर विरोधकांनाही सोबत घेऊन आमदार शेळके मार्गक्रमण करताना दिसत आहेत. यामुळेच मावळच्या विकासाचा रथ आता वेगाने दौडू लागला आहे. हा विकासरथ असाच वेगाने धावत राहो आणि या रथाचे सारथ्य करणारे आमदार सुनील शेळके यांना दीर्घायू लाभो, याच टीम दैनिक मावळकडून आमदार महोदयांना शुभेच्छा.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच