Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोमवारी (दि. 20 ऑक्टोबर ) भव्य अशा समारंभात करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांसमवेत राज्यातील मंत्री दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या भाषणाची आणि त्यांनी सांगितलेल्या किस्स्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या भाषणात 2019 च्या विधानसभा निवडणुकीबाबतचा एक किस्सा सांगितला. मुरलीधर मोहोळ म्हणाले, “2019च्या विधानसभा निवडणुकी वेळचा एक किस्सा आहे. जो सुनील शेळके आणि मलाच माहिती आहे. 2019ला जेव्हा विधानसभा निवडणूक लागली, त्यावेळेस सुनील शेळके आणि मी दोघेही भाजपमध्ये होतो. त्यावेळी मावळमधून उमेदवारी मिळावी, यासाठी सुनील शेळके हे प्रयत्न करत होते. मात्र त्यांना जेव्हा समजलं की भाजपमधून आपल्याला तिकीट मिळू शकत नाही, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर झाली.”
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनील शेळके यांनी पहिला फोन मला केला आणि म्हणाले, “माझी उमेदवारी कट झाली, मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि आता मला उमेदवारी मिळाली. तुमची ही कोथरूडमधून उमेदवारी कट झाली आहे. त्या ठिकाणी दादा ( चंद्रकांत पाटील ) आले आहेत, त्यांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील माझ्यासोबत राष्ट्रवादीमध्ये चला,” अशी ऑफर आपल्याला सुनील शेळके यांनी त्यावेळी दिल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मोहोळ पुढे म्हणाले, “मात्र मी त्यांना सांगितलं की, मी दिल्या घरी सुखी आहे आणि तुम्ही देखील भाजप सोडून जाऊ नका, असं सुनील शेळके यांनी सांगितलं. त्यावर त्यांनी, मी आता परतीचे दोर कापले आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांचं भलं झालं. आणि मी भाजपमध्येच राहिलो आणि माझं देखील भलं झालं.” असा 2019 सालचा किस्सा मोहोळ यांनी सांगितला. यानंतर सभास्थानी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना : ‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला मिळणार अधिकार
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
