Dainik Maval News : गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. अद्याप यांतील काही निवडणुका 20 डिसेंबरला होणार असून एकत्रित 21 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान अनेक वर्षांनी होत असलेल्या ‘स्थानिक’च्या निवडणुका घेण्यात राज्य निवडणूक आयोगाची दमछाक होत असून आयोगाचा भोंगळ कारभार सर्वांसमोर आहे. परंतु दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या निवडणुका अशी ओळख असलेल्या या निवडणुकांत लोकशाहीची दैना झाल्याचे दिसून आले. सगळीकडेच राडा.. गोंधळ.. पैशांचा पाऊस आणि ‘नियमांची ऐशी की तैशी’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मावळ तालुका देखील याला अपवाद राहिला नाही.
मावळ तालुक्यात लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत या तीन ठिकाणी निवडणुका झाल्या, अद्याप तळेगाव दाभाडे शहरातील सहा नगरसेवक पदाच्या आणि लोणावळ्यात दोन नगरसेवक पदाच्या निवडणुका होणे बाकी आहे. परंतु ज्या ठिकाणच्या निवडणुका झाल्या, तिथेही सुरूवात ही विकासाच्या मुद्द्यावर झाली आणि शेवट मात्र पैशाच्या मुद्द्यावर झाला.
मावळ तालुक्यात तळेगाव, लोणावळा आणि वडगाव या ठिकाणच्या निवडणुकीत अगदी पैशांचा पाऊस पडल्याचा भास झाला. किमान 5 हजार अन् अगदी वीस हजार रुपये इतका मताला भाव राहिल्याची चर्चा आजही नागरिकांत होत आहे. सुरूवातीचे सर्व दिवस हे प्रचारात विकास – व्हिजन आणि काम करत आलोय, काम करीत राहू असेच होते. परंतु जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला, तसतसा मतांचा बाजार व्हायला सुरूवात झाली आणि उमेदवारांचे खिसे रिकामे व्हायला सुरूवात झाली.
आजमितीस या तिन्ही शहरात झालेल्या निवडणुकीत अपवादात्मक उमेदवार वगळल्यास सर्व उमेदवारांचे खिसे रिकामे झाले असून काहीजण कर्जबाजारी झाले आहेत. लोकशाहीची दैना झाल्याचे चित्र मावळ तालुक्याने आताच्या या निवडणुकीत पाहिले. उमेदवार पुन्हा कधी निवडणुक होणारच नाही, अशा वेडेपणाच्या भावनेने खर्च करीत राहिले. तर अपवाद वगळता लोकशाहीत राजा असलेल्या मतदाराने स्वतःच्या मतांची किंमत ठरवून पाच वर्षांसाठी स्वतःच्या तोंडावर कुलून लावून घेतले.
ही निवडणूक विकासाची न राहता पैशांची झाली. एकुणच आता जेव्हा निकाल लागेल तेव्हा, कोण कुणाला किती सरस ठरले ह्याचा हा निकाल असेल. ना तो लोकशाहीचा विजय असेल ना विकास अन् व्हिजनचा.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; काय आहे नागपूर खंडपीठाचा आदेश? वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
