Dainik Maval News : ‘फास्टटॅग’मध्ये रक्कम नसल्याने तळेगाव टोलनाक्यावर शिवनेरी बस थांबवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बस जेव्हा थांबविली तेव्हा बसमध्ये एका गर्भवतीसह अनेक प्रवासी होते. सर्वच प्रवाशांना सुमारे तासभर मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर प्रवाशांनी वर्गणी गोळा करून टोल भरला आणि नंतरच टोल प्लाझा वरील कर्मचाऱ्यांनी बस सोडली, असा हा गंभीर प्रकार आणि तितकाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील निष्काळजीपणा दाखविणारा प्रकार उघड झाला आहे. एका प्रसिद्ध दैनिकाने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
नेमका प्रकार काय घडला?
बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील दादर येथून पुण्याच्या दिशेने ई-शिवनेरी बस (क्रमांक : MH 12 VF 5207) रवाना झाली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बस तळेगाव टोलनाक्यावर पोहोचली. स्कॅनिंग दरम्यान बसच्या फास्टटॅग खात्यात पैसे नसल्याचे समोर आले. टोल भरल्याशिवाय बस पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका टोल कर्मचाऱ्यांनी घेतली.
दरम्यान याचवेळी बसमध्ये एक गर्भवती महिला आणि वृद्ध प्रवासी मोठ्या संख्येने होते. रात्रीची वेळ आणि तांत्रिक बिघाड नसताना केवळ ‘रीचार्ज’ नसल्यामुळे प्रवाशांना तासभर टोलवर ताटकळत उभे राहावे लागले. बस चालकाने डेपो व्यवस्थापनाशी संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथूनही तात्काळ मदत मिळाली नाही. अखेर प्रवाशांनीच वर्गणी करून टोलचे पैसे भरले आणि बस मार्गस्थ झाली.
प्रवाशांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून दंडासह सुमारे १४०० रुपयांचा टोल रोख स्वरूपात भरला. या अपमानस्पद अनुभवानंतर प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. खरेतर पुणे-मुंबई प्रवासासाठी प्रवाशांकडून शिवनेरी बसचे जादा भाडे आकारले जाते. मात्र अशा प्रीमियम सेवेमध्येही फास्टटॅग रिचार्ज नसावा, ही संबंधित प्रशासनाची मोठी चूक मानली जात असून कारवाईची मागणी होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

