Dainik Maval News : राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत ; तसेच पात्र मतदारांनी निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, संपूर्ण निवडणुकीच्या कामकाजाकरिता संपूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
राज्यातील 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. 143 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून त्यानुसार शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. यामध्ये बारामती आणि फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेकरिता पूर्ण निवडणूक तर लोणावळा, तळेगाव दाभाडे व दौंड या नगरपरिषदेच्या काही प्रभागांचा समावेश आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरिता बारामतीमध्ये १४ उमेदवार तसेच फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद येथे ७ उमेदवार आहेत. तसेच बारामती येथील ४१ जागांकरिता १५५ उमेदवार, फुरसुंगी-उरुळी देवाची येथील ३२ जागांसाठी १२० उमेदवार, दौंड येथील एका जागेसाठी (प्रभाग क्र.९ अ) ३ उमेदवार, लोणावळा येथील २ जागांसाठी (प्रभाग क्र. ५ ब व १० अ) ५ उमेदवार आणि तळेगाव दाभाडे येथील ५ जागांसाठी (२ अ, ८ अ, ८ ब, ७ ब व १० ब) १२ उमेदवार आहेत.
सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आदी अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून एकूण १ हजार ४२५ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत असणार आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलींग पार्टी सर्व साहित्यासहित आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या असून मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज आहेत. २ डिसेंबर रोजी झालेल्या व २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी डुडी म्हणाले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

