Dainik Maval News : तळेगाव दाभाडे (पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, जि. पुणे) पोलीस ठाण्याचे पथक श्रीरामपूरमध्ये (जि. अहमदनगर) एका आरोपीला पकडण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर ३० ते ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केली. शहरातील इराणी गल्ली (वॉर्ड नं. १) येथे ही घटना घडली. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर कोयत्याचा वार झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलूीस उपनिरीक्षकाने स्वसंरक्षणार्थ शासकीय पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली. या धाडसी कारवाईनंतर मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद हा श्रीरामपूर येथे घरी असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथील पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, हेडकॉन्स्टेबल संतोष जाधव, कॉन्स्टेबल प्रीतम सानप, प्रकाश जाधव व किरण मदने यांचे पथक बुधवारी (दि. 7) दुपारी श्रीरामपूरला आले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन हे पथक खासगी वाहनाने शहरातील इराणी गल्लीत (वार्ड नं. 1) दाखल झाले.
पोलीस दुपारी पावणेतीनच्या सुमारास आरोपीच्या घराजवळ गेले. तेव्हा आरोपीच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे उपनिरीक्षक मोहारे आणि महिला पोलिस घरात गेले आणि आरोपी आयदबाबत विचारणा केली. घरातील एक लहान मुलगा व महिलांनी ‘आयद येथे नाही’ असे सांगितले आणि घराची झडती घेण्यासही विरोध केला. दरम्यान, तेथेच असलेला आरोपी आयद पोलिसांना पाहून घराच्या पाठीमागील दरवाजातून बाहेर पळाला. घराच्या मागे थांबलेले पोलिस कॉन्स्टेबल किरण मदने यांनी ते पाहिले आणि त्याला पकडण्यासाठी पळत मदतीसाठी अन्य सहकाऱ्यांना हाका मारल्या. त्यामुळे पोलीस घराच्या पाठीमागे पळाले. मदने यांनी पळत जाऊन घराच्या कम्पाउंडवरून उडी मारून आयदला जागीच पकडले.
दरम्यान, तोपर्यंत अन्य पोलिसांनी आयदला पकडले. तो पोलिसांना प्रतिकार करत झटापट करू लागला. त्यावेळी गल्लीत मोठी गर्दी झाली होती. मात्र या गर्दीतील 5 ते 7 जणांनी आरोपी आयदला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी तेही पोलिसांशी झटापट करू लागले. त्याचवेळी जमावातील 18 ते 19 वयोगटातील एक मुलगा हातात कोयता घेऊन शिवीगाळ करत पोलिसांवर धावून आला.
कोणाला काही कळायच्या आत त्याने कॉन्स्टेबल किरण मदने यांच्या डोक्यावर कोयत्याचा वार केला. मात्र मदने यांनी ते हातावर झेलला. त्यामुळे त्यांच्या हाताला मोठी जखम होऊन ते रक्तबंबाळ झाले. दुसरीकडे जमावातील लोक आरोपीला सोडविण्यासाठी शिवीगाळ करत पोलिसांशी झटापट करत होते.
मदने रक्तबंबाळ झालेले पाहून आणि जमाव हिंसक होत चालल्याचे पाहून पोलिस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी स्वसंरक्षणार्थ त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत एक गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून जमावाने लगेच पळ काढला. दरम्यान, तोपर्यंत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील तीन ते चार पोलिस त्यांच्या मदतीस आले.
जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी आयद सय्यद याला ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल अजय विलास सरजिने यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आयद बाबूलाल सय्यद, झेरू (पूर्ण नाव समजले नाही) आणि महिलांसह अन्य 5 ते 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी आयद घेऊन तळेगाव दाभाडे पोलीस रवाना झाले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची होणार निवड ; मंगळवारी पालिकेची पहिली सभा
– अजित पवारांचा मोठा निर्णय ! एक दोन नव्हे तर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ; पुणे जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यासाठी मास्टर प्लॅन
– वडगाव नगरपंचायतीत भाजपाकडून स्विकृत नगरसेवक पदासाठी संदीप म्हाळसकर यांचे नाव जवळपास निश्चित
– मोठी बातमी ! विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

