Dainik Maval News : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मृती प्रित्यर्थ मावळ तालुक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘धर्मवीर बलिदान मास’ अत्यंत श्रद्धापूर्वक व शोकमय वातावरणात पाळला जात आहे.
३० दिवसांचे खडतर व्रत
इतिहासात वर्णन केल्याप्रमाणे, संभाजी महाराजांनी सोसलेला अमानुष छळ आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान याचे स्मरण म्हणून फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या यावर्षी १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत हा बलिदान मास पाळला जातो.
ह्या ३० दिवसांच्या काळात शंभूभक्त विविध नियमांचे पालन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
*अनेक जण महिनाभर पायात चप्पल न घालण्याचा संकल्प करतात.
*अनेक जण आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग (उदा. गोड पदार्थ, चहा) करतात.
*काही जण शोक व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञता म्हणून मुंडन करतात.
गावागावात प्रतिमेचे पूजन
मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये दररोज सायंकाळी ग्रामस्थ एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र ,प्रेरणा मंत्र तसेच संभाजीसुर्यहृदय श्लोक म्हणून अभिवादन करत आहेत. यावेळी महाराजांच्या पराक्रमाचे आणि बलिदानाचे वाचन करून त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला जातो.
बलिदानातून प्रेरणेचा जागर
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या या उपक्रमामुळे तरुणांमध्ये हिंदवी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांबद्दलची ओढ वाढत आहे. “महाराजांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांच्या त्या बलिदानाची जाणीव पुढील पिढीला व्हावी, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,” अशी भावना धारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमात धारकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या राजाबद्दलचा आदरभाव व्यक्त करत आहे.
फाल्गुन अमावस्या दिनांक १८ मार्च रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची न निघालेली अंत्ययात्रा म्हणजेच मूकपदयात्रा गावोगावी काढण्यात येणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण
– राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी
– मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात