Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात यंदा जुलैअखेर पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या १७९.९ टक्के पावसाची नोंद झाली. या कालावधीतील जिल्ह्याचा सरासरी पाऊस ३०९.३ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात ५५६.३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाच्या प्रमाणात मावळ तालुका (१६८०.३ मि.मी.) आघाडीवर आहे; मात्र सरासरीच्या तुलनेतील टक्केवारीमध्ये खेड तालुक्यात सर्वाधिक ३९०.९ टक्के पाऊस नोंदला आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात सर्वाधिक १,६८०.३ मिलिमीटर, म्हणजेच सरासरीच्या ३५८.९ टक्के पाऊस नोंदविण्यात आला. मावळमध्ये एकूण २५ पावसाचे दिवस नोंदले गेले. पावसाच्या टक्केवारीत खेड तालुका आघाडीवर असून, तालुक्याची सरासरी १६५.६ मिलिमीटर असून तेथे २२ पावसाच्या दिवसांत सरासरीच्या ३९०.९ टक्के अर्थात ६७४.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात तुलनेने सर्वांत कमी पाऊस इंदापूर तालुक्यात झाला. मात्र, इंदापुरातही आठ पावसाच्या दिवसांत ८४.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या १०४.१ टक्के पाऊस नोंदला गेला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाने संबंधित कालावधीची सरासरी ओलांडली आहे. पुणे शहरात १७ दिवसांत सरासरीच्या (१८४ लिमिमीटर) २४९.६ टक्के पाऊस पडला.
मुळशी, मावळ, वेल्हे आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी सर्वाधिक २५ पावसाचे दिवस नोंदले गेले. भोरमध्ये २३, खेडमध्ये २२, जुन्नरमध्ये २०, तर हवेलीमध्ये १९ पावसाचे दिवस होते. सर्वांत कमी सात पावसाचे दिवस बारामतीत नोंदविण्यात आले. इंदापूरमध्ये आठ, दौंडमध्ये नऊ आणि शिरूरमध्ये दहा पावसाचे दिवस होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या
– मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता
– लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख
– रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी


