Dainik Maval News : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत ( दि. २५ मार्च ) भाजपाचे सुभाषराव जाधव यांनी चार मतांनी अनपेक्षित विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला. तर, उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विलास मानकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मावळ बाजार समितीचे मावळते सभापती संभाजी शिंदे व उपसभापती नामदेव शेलार यांनी नुकतेच त्यांच्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापती, उपसभापती पदासाठी सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ येथील सहायक निबंधक कार्यालयात बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे विक्रम कलवडे तर भाजपाचे सुभाषराव जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीचे विलास मानकर व भाजपचे सोमनाथ मांडेकर यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, मांडेकर यांनी अर्ज मागे घेतल्याने विलास मानकर यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली. तर, सभापती पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये भाजपचे सुभाषराव जाधव यांना 11 मते मिळाली तर राष्ट्रवादीचे विक्रम कलावडे यांना 7 मते मिळाली. त्यामुळे चार मतांनी जाधव यांनी विजय मिळवल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली.
वास्तविक बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे 12, काँग्रेसचे एक व भाजपचे पाच असे संख्याबळ आहे. यापूर्वी सभापती व उपसभापती दोन्ही पदे राष्ट्रवादीकडे होती. दरम्यान, आगामी काळात सर्वांना पदाची संधी मिळावी, यादृष्टीने चिठ्ठीद्वारे निवडप्रक्रिया करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने घेतला होता, अशी चर्चा झाली.
परंतु बुधवारी निवडणुकीपूर्वी फक्त राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक झाली आणि त्यामध्ये चिठ्ठीद्वारे उमेदवार घोषित करण्यात आले. यामध्ये विक्रम कलवडे व विलास मानकर यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना पक्षाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान अगोदरच निर्णय झालेला असताना त्यानंतरच्या बैठकीत विश्वासात न घेतल्याने भाजपच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने सर्वांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.
या दरम्यान झालेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी व काँग्रेसचे मिळून 13 संचालक व भाजपचे अवघे 5 संचालक असताना राष्ट्रवादीचे उमेदवार कलवडे यांना अवघी 7 मते मिळाली. तर, भाजपचे उमेदवार जाधव यांना 11 मते मिळाली आणि एकहाती वर्चस्व असलेल्या बाजार समितीवर भाजपने अनपेक्षित झेंडा फडकवला.
मतदान प्रक्रियेत बाजार समितीचे संचालक संभाजी शिंदे, नामदेव शेलार, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विलास मालपोटे, बंडू घोजगे, साईनाथ मांडेकर, सुप्रिया मालपोटे, अंजली जांभूळकर, शिवाजी असवले, नथुराम वाघमारे, अमोल मोकाशी, साहेबराव टकले, नामदेव कोंडे, शंकर वाजे यांनी सहभाग घेतला.
बाजार समितीमध्ये 18 पैकी 13 संचालक राष्ट्रवादीचे असताना राष्ट्रवादीच्या उमेदवारास अवघी सात मते मिळाली. त्यामुळे सहा जणांनी भाजपचे उमेदवार जाधव यांना मतदान केल्याचे उघड झाले. संबंधित फुटलेल्या उमेदवारांनी 20-20 हजार रुपये घेऊन पक्षनिष्ठा बाजूला ठेवल्याचा आरोप पराभूत उमेदवार विक्रम कलवडे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक
– तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
– वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
– यंदाचा गुढीपाडवा ठरला ऐतिहासिक ! आई एकविरा देवीच्या मंदिराचा चोरीला गेलेला कळस तब्बल ८ वर्षांनी मिळाला
