Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन परिसरातील कटारिया परिवाराने अत्यंत दुःखद प्रसंगात घेतलेल्या निर्णयातून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. २३ वर्षीय वियश विनोद कटारिया याचे ११ मे २०२६ रोजी अपघाती निधन झाले. मुलाच्या निधनाच्या दुःखावर मात करत परिवाराने त्याच्या अवयवांचे दान करण्याचा धाडसी आणि मानवतावादी निर्णय घेतला.
वियश कटारिया यांच्या मरणोत्तर अवयवदानामुळे एकाचवेळी चार व्यक्तींना नवजीवन मिळाले आहे. त्यांच्या दोन किडनी, लिव्हर आणि हृदयाचे यशस्वी दान करण्यात आले. या निर्णयामुळे अनेक रुग्णांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली असून, वियश यांची स्मृती कायम जिवंत राहणार आहे.
अवयवदानाचा निर्णय घेणे अत्यंत कठीण मानले जाते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, धार्मिक समजुती आणि अंत्यसंस्कारांबाबतच्या भावना यामुळे अनेक कुटुंबे अशा निर्णयापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत मनाचा मोठा कणखरपणा आणि कुटुंबातील एकमत आवश्यक असते. कटारिया परिवाराने हे धैर्य दाखवत समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
अवयवदान प्रक्रियेत वेळेचे मोठे महत्त्व असते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली अत्यंत काळजीपूर्वक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ज्या कुटुंबांना अवयव मिळण्याची प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी कटारिया परिवार देवदूत ठरला आहे.
समाजात रक्तदानाप्रमाणेच अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हजारो कुटुंबांमधून एखादेच कुटुंब असा निर्णय घेते. त्यामुळे कटारिया परिवाराचा हा निर्णय केवळ आदर्शच नाही, तर समाजाला जागृती देणारा आणि प्रेरणा देणारा ठरत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम
– तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा
– इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार
– विद्यार्थ्यांना इस्रोसह अमेरिकेतील नासा केंद्राला भेटीची मिळणार संधी ; ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ उपक्रमाला शासनाची मान्यता