Dainik Maval News : वडगाव शहरातील ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे झालेल्या नुकसानांचा प्रशासनाने पंचनामा करून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, यासाठी नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे आणि नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, राहुल ढोरे, गणेश म्हाळसकर, अजय भवार यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांना लेखी निवेदन देऊन त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांना अनेक कुटुंबीयांच्या मालमत्तांचे पंचनामे तसेच नाल्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना दिल्या.
वडगाव शहरात दरवर्षी पावसाचे प्रमाण मोठे असतेच. परंतु यंदाच्या सततच्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खालील नैसर्गिक ओढे-नाल्यांना प्रचंड पूर आला आहे :
१) प्रभाग क्रमांक १७ मधून जाणारा दक्षिण-उत्तर ओढा,
२) प्रभाग क्रमांक १० व ११ मधील गावठाणातून जाणारा दक्षिण-उत्तर ओढा,
३) वडगाव स्मशानभूमीतून हायवे ते रेल्वेपर्यंत जाणारा दक्षिण-उत्तर ओढा, तसेच
४) भिलारे वस्तीकडील ओढा.
या पुरामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. दिनांक ०७/०७/२०२६ रोजी नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत असे आढळले की, अनेक नागरिकांनी व बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःच्या सोयीसाठी बहुतांश नाल्यांवर अतिक्रमण केले असून काही ठिकाणी नाल्यांचा प्रवाह जाणूनबुजून वळवण्यात आला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नैसर्गिक मार्गाने वाहून न जाता रहिवासी भागात व शेतात शिरून नुकसान झाले आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर:
१. वडगाव शहरातील संपूर्ण नैसर्गिक ओढे-नाल्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे.
२. सर्वेक्षणाअंती ओढे-नाल्यांवरील अतिक्रमित बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
३. पुरामुळे नागरिकांच्या झालेल्या वित्तहानीबाबत भरपाईसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी.
४. ज्या रहिवासी इमारती व प्लॉटिंग प्रकल्पांना नाल्याचा प्रवाह विचारात न घेता बांधकाम परवानग्या व पूर्णत्वाचे दाखले देण्यात आले, त्याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती नगररचना / नगरविकास विभागाकडून लेखी स्वरूपात मिळावी.
५. ज्यांनी नाले बंदिस्त केले, अतिक्रमण केले, प्रवाहाची दिशा बदलली अथवा नाल्याची जागा नष्ट केली, अशा जागामालक / बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करावी व तसा अहवाल सादर करावा.
६. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन, ज्यांच्या मालमत्तेचे व शेतीचे नुकसान झाले त्याचा आढावा नगरपंचायतीमार्फत घेऊन तसा अहवाल सादर करावा.
वरील सर्व सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी सूचना करण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग यांना लेखी निवेदनाद्वारे देखील कळविण्यात आले आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अबोली मयुर ढोरे यांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
