Dainik Maval News : लोणावळा शहरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा तातडीने निपटारा करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी (दि.१०) नगरपरिषद सभागृहात प्रशासनाची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत पूरबाधित नागरिकांना तातडीची मदत, नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे, नाल्यांवरील अतिक्रमणे हटविणे तसेच भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीला महसूल, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, टाटा प्रकल्पाचे अधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूरबाधित कुटुंबांना टाटा कंपनीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाठपुरावा करावा, अशा सूचना आमदार शेळके यांनी दिल्या. तसेच टाटा धरणातील गाळ काढून खोलीकरण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
पूरामुळे नुकसान झालेल्या घरांचे वस्तुनिष्ठ पंचनामे उद्यापासून महसूल व नगरपरिषद प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पात्र नागरिकांना शासनाची मदत वेळेत मिळावी, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील अनेक नाल्यांवर झालेली अतिक्रमणे आणि नाले अरुंद केल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून नाले मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले.
बैठकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. बाधित कुटुंबांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांना आवश्यकतेनुसार अन्नधान्य किट, जीवनावश्यक वस्तू आणि इतर सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. नगरपरिषदेत आपल्या समस्या मांडण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे समाधान करण्याचाही प्रयत्न आमदार शेळके यांनी केला.
“लोणावळ्यातील एकाही पूरग्रस्त नागरिकाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. या संकटाच्या काळात मी आणि संपूर्ण प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पूरस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविणे, नुकसानग्रस्तांना दिलासा देणे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या निर्णयांमुळे ही बैठक लोणावळा शहरासाठी अत्यंत महत्त्वाची ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
