Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग आणि पुणे–शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग या तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकताच घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बैठकीत ठरल्यानुसार या तीनही प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवारी (दि. १८ जुलै) रोजी दुपारी १.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांसह कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर, बाबाजी काळे, राहुल कुल, सुनील कांबळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर कटके, योगेश टिळेकर, चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदविला.
यावेळी मंत्री भोसले म्हणाले, पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे तीन प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व प्रकल्पांची कामे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना व अपेक्षांचा योग्य विचार केला जाईल, असे सांगितले.
स्व. अजितदादा पवार यांनी या महामार्गाच्या कामास हिरवा कंदील दाखविला होता. मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहती, तळेगावसह सर्व शहरी भाग, ग्रामीण भागातील जनतेसाठी तळेगाव-चाकण मार्गाचे होणारे विस्तारीकरण, उन्नत महामार्ग हा तालुक्याच्या विकासातील महत्वाचा टप्पा आहे. याबाबत सातत्याने सभागृहात, अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून पाठपुरावा केला होता. आज त्याला यश आले आहे. – श्री. सुनील शेळके, आमदार, मावळ

( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
