Dainik Maval News : श्री क्षेत्र एकवीरा देवी देवस्थान परिसरातील विविध प्रलंबित मूलभूत समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी वेहरगाव व दहिवली ग्रामस्थांनी रविवारी एकवीरा देवी मंदिर परिसरात बंद पुकारून एकवीरा पायथा मंदिर ते मुंबई पुणे महामार्ग कार्ला फाटा पायी भव्य मोर्चा काढत मुंबई पुणे महामार्ग अडवून रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन केले.
काही काळानंतर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ग्रामस्थ व प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी सर्व विभागाची संयुक्त बैठक घेऊन यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले. या आंदोलनात वेहरगाव दहिवली गावातील नागरिकांनी गावची एकी दाखवत गावातील सर्व तरुणांना पासून महिला भगिनी व लहान मुलाच्या सह पावसाची तमा न बाळगता ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलन कर्त्यांनी आपली मत व्यक्त करताना आमचा विकासाला विरोध नसून मंदिर परिसरातील ज्या समस्या आहेत त्या पहिल्या सोडवा व आमच्या हक्काची भाकर हिरावून घेऊन आम्हाला भिकेला लावणारा रोपवे प्रकल्प रद्द करावा अशी महत्वाची मागणी केली. तसेच आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या नवरात्रौत्सव काळात अजून उग्र आंदोलन करण्यात येईल असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वेहरगाव येथील स्थानिक व्यवसायिक , रिक्षाचालक व इतर व्यवसाय करणाऱ्या ग्रामस्थांचा रोजगार हिरावून घेणारा रोपवे प्रकल्प रद्द झाला पाहिजे तसेच हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी जोर लावून करण्यात आली.
पायऱ्या, पायवाट, पिण्याचे पाणी, शौचालये, वाहतूक व सुरक्षाव्यवस्था यांसह विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या समस्यांबाबत संबंधित शासकीय विभागांकडे वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच कार्ला फाटा ते श्री आई एकवीरा देवी मंदिर व गडावर जाणाऱ्या रस्त्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करणे, देवस्थान परिसरातील वाहतूक कोंडी व वाद लक्षात घेऊन कायमस्वरूपी पोलीस चौकी सुरू करणे आणि आवश्यक पोलीस कर्मचारी नियुक्त करणे यांचा समावेश आहे.
तसेच भाविकांसाठी सुरू असलेल्या पायऱ्यांच्या कामाची चौकशी करून तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाविक व पर्यटकांसाठी शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्था करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. देवस्थान परिसरात अनधिकृत वाहतूक व मद्यपान करून परिसराच्या पावित्र्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून कायमस्वरूपी बंदी घालावी, वनविभागाच्या जागेतील वाहनतळ ग्रामपंचायतला वर्ग करावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडु नये आंदोलनाला चिघळू नये यासाठी लोणावळा पोलीस विभागीय अधिकारी गजानन टोम्पे, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ज्यादाचा पोलीस फोर्स मागून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती तर कार्ला फाटा परिसरात छावणीचे स्वरूप आले होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक
