लोणावळा, दि. १९ (प्रतिनिधी) – लोणावळा शहरातील पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी लोणावळा नगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मदतवाटपाची प्रक्रिया पुढे सरकली आहे.
पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी यासाठी नगरपालिकेने बाधित नागरिकांचे सर्वेक्षण, पंचनामे, प्रतिज्ञापत्रे आणि एकत्रित अहवाल तयार करून संबंधित प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे पात्र पूरग्रस्तांच्या बँक खात्यांमध्ये शासनाकडून थेट आर्थिक मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती लोणावळा नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोणावळा शहरात आलेल्या पूरस्थितीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे तसेच व्यावसायिक मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांसह व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. पूरग्रस्तांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांना मदत मिळवून देणार असल्याचे लोणावळा नगरपालिकेने यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला.
नगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात *१,९८३ आपत्तीग्रस्तांची नोंद* करण्यात आली असून, सुमारे दोन हजार कुटुंबे आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीची माहिती संकलित करण्यात आली आहे. बाधित नागरिकांचे पंचनामे, प्रतिज्ञापत्रे आणि एकत्रित अहवाल तयार करून संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यावर नगरपालिकेने भर दिला.
शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीचे वाटप लवकरच सुरू होणार असून, पात्र लाभार्थ्यांच्या सर्वेक्षणादरम्यान नोंदविण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये थेट मदतीची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय टाटा कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या मदतनिधीचे वाटपही लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक दिवसांपासून आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळाल्यास बाधित नागरिकांना सण साजरा करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे.
यासंदर्भात लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे तसेच नगरसेवक सनी घोणे, स्वप्ना कदम, मुकेश परमार आणि निखिल कविश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आई व मुलीच्या बचावाचा थरार !! टायगर पॉइंट येथे दरीत पडलेल्या माय लेकींचे प्राण वाचविण्यात बचाव पथकाला यश
– लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’
– जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी
