Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मावळचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधीलच आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. १६) जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दोघांनीही एकमेकांविरोधात बंडगार्डन पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
आमदार सुनील शेळके यांनी, आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा आणि संवेदनशील माहिती गुन्हेगार व विरोधकांना देत असल्याचा गंभीर आरोप केला, तर आमदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता गुजर यांनी केला.
आमदार सुनील शेळके हे शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी दुपारी तीनच्या सुमारास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी हा प्रकार घडला.
आमदार सुनील शेळकेंचा आरोप काय?
सुनील गुजर हे गेल्या वर्षभरापासून आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे. आरटीआयच्या माध्यमातून स्वतःशी संबंधित माहिती मिळवून ती विरोधकांसह गुन्हेगारांना पुरवली जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने आरटीआय अर्ज करून आपल्याशी संबंधित कागदपत्रं मिळवण्यात आल्याचा आरोपही शेळके यांनी केला.
सुनील गुजर यांचा आरोप काय?
आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सुनील गुजर यांनी केला आहे. गुजर यांच्या म्हणण्यानुसार, बॅग ओढून घेत, त्यांना एका खोली नेहून मारहाण केल्याचा गुजरांनी आरोप केला.
सीसीटीव्हीतून काय समोर आलं?
पोलिसांच्या दाव्यानुसार, गुजर यांना खोलीत नेईपर्यंतच्या फुटेजमध्ये आमदार शेळके यांनी त्यांना स्पर्श केल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र, ज्या खोलीत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला, त्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नसल्याची प्राथमिक माहिती आहे, त्यामुळे आमदार शेळके यांनी गुजर यांना मारहाण केल्याचा सबळ पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे समजते.
आमदार सुनील शेळके यांनीही मारहाणीचे आरोप फेटाळलेत. मारहाण केली असती तर कुठं लागलं हे दाखवावं, उगाच खोटे-नाटे आरोप करु नयेत. तसंही पोलीस चौकशी करतायेत, त्यातून सर्व सत्य बाहेर येईलच. माझी कागदपत्रे त्याने कशासाठी ठेवली होती? तो माझी माहिती कोणाला पुरवत होता? गेली दीड-दोन वर्षे तो माझ्यावर पाळत का ठेवत होता? याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी आमदार शेळकेंनी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!
– वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त
– घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू
– दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

