प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि सध्याच्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक असलेले आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर सातत्याने बोट ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर देणारे बच्चू कडू यांना शांत करण्याचा किंवा त्यांची नाराजी दूर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याची चर्चा यामुळे राजकीय वर्तूळात सुरु झाली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘यासाठी’ देण्यात आला मंत्रिपदाचा दर्जा
राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाद्वारे ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष पद आणि प्रमुख मार्गदर्शक हे आमदार बच्चू कडू यांना दिले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शासनाने यासंबधी परिपत्रक काढून कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला आहे. मागील वीस वर्षांपासून बच्चू कडू हे दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. त्यांच्याच रेट्यामुळे राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आला. ( MLA Bacchu Kadu given Ministerial Status By Shinde Fadnavis Government Maharashtra )
नाराजी नेमकी काय?
तत्कालीन ठाकरे सरकारमध्येही बच्चू कडू हे मंत्री होते. परंतू एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील होत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले, तेव्हा त्याला कडूंनी पाठींबा दिला. मात्र शिंदेच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी न दिल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसून आली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा लांबत गेल्याने त्यांनी अनेकदा सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यांची हीच नाराजी कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
अधिक वाचा –
– दुचाकी चालवणाऱ्या प्रत्येकाने ही बातमी नक्की वाचा, 24 मे हा दिवस असणार अत्यंत महत्वाचा
– मावळ तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम, पाहा तुमच्या भागात कधी आणि कुठे असेल कॅम्प