राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपण अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुनश्च अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले. यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ( After NCP Core Committee Rejects Resignation MP Sharad Pawar to Continue Leading Party )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले शरद पवार?
“2 मे 2023 रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या विमोचन समारंभाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील 63 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली.”
“लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास याने मी भारावून गेलो. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे असे ठरवले, या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.”
“मी पुनश्च अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसापर्यंत पोहचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन.”
“आपण सातत्याने दिलेली हाथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यश-अपयशात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुनश्च जाहीर करतो.”
अधिक वाचा –
– मोठी बातमी! अखेर शरद पवारांची माघार, पक्षाध्यक्षपदी कायम राहणार, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
– चलो पवनानगर..! पवना धरणग्रस्तांचा 9 मे रोजी काले कॉलनी ते पवनाधरण बंधाऱ्यापर्यंत भव्य मोर्चा