Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे शुक्रवारी (दि. 16 ऑगस्ट) रोजी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्यातील महिलांनी यावेळी विक्रमी गर्दी केली होती. सभास्थानी जागा अपुरी पडल्यामुळे बाहेरचे रस्ते देखील महिलांच्या गर्दीने फुलून गेले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या भव्य मैदानावर झालेल्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध समाज घटकातील महिलांनी अजितदादांना प्रतिनिधिक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी महिला भगिनींचा प्रतिसाद पाहून आमदार सुनिल शेळके भावूक झाले. ( Ajit Pawar Jan Samman Yatra Maval Taluka Talegaon Dabhade MLA Sunil Shelke emotional speech )
आमदार सुनिल शेळकेंच्या डोळ्यात पाणी –
आमदार सुनिल शेळके यांनी विक्रमी संख्येने उपस्थित राहिलेल्या भगिनींविषयी आपल्या प्रास्ताविकात कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उठून आमदार शेळके यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना सावरण्यासाठी मदत केली. मावळच्या जनतेने साडेचार वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवला,तो मी सार्थ करुन दाखवला, असे नमूद करत आमदार शेळके यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.
अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडचा आणि बारामतीचा कायापालट केला, पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, याची सल मनाला अजूनही बोचते, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली. अजितदादांनी मावळसाठी खूप काही केले आहे. आणि मावळची जनता त्याची नक्की जाण ठेवील. मावळची जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणारी नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली. मावळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे असे कळकळीचे आवाहनही शेळके यांनी यावेळी केले. जनसन्मान यात्रा व रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते.
अधिक वाचा –
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर
– बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News