कामशेत, दि. २८ (प्रतिनिधी) : पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अविभाज्य भाग. वर्षानुवर्षे कोणतीही खंड पडू न देता वारीची परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ वारकरी बांधवांच्या अखंड सेवेचा गौरव करण्यासाठी कामशेत ग्रामीण पत्रकार संघ, मावळ यांच्या वतीने ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार – २०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता नायगाव, कामशेत येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
अखंड वारी करणाऱ्या तसेच वयाची ७० वर्षे पूर्ण केलेल्या वारकरी बांधवांच्या दीर्घकालीन वारी सेवेची दखल घेत त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पवन मावळ, नाणे मावळ आणि अंदर मावळातील एकूण १५ ज्येष्ठ वारकऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे.
पवन मावळातील ह.भ.प. भिकाजी धोंडू ठाकर, ह.भ.प. भागूजी महाराज ठोंबरे, ह.भ.प. भगवान महाराज लोखंडे, ह.भ.प. सोपान महाराज येणपुरे आणि ह.भ.प. रघुनाथ वाघुजी आडकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
नाणे मावळातील ह.भ.प. सदाशिव जगताप, ह.भ.प. शंकर महाराज शिरसट, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज टाकळकर, ह.भ.प. संभाजी भानुसघरे आणि ह.भ.प. भरत महाराज गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
तर अंदर मावळातील ह.भ.प. रामचंद्र महाराज आलम, ह.भ.प. भागोजी महाराज करांडे, ह.भ.प. सिताराम महाराज तनपुरे, ह.भ.प. महादू महाराज कुटे आणि ह.भ.प. दत्तोबा महाराज मालपोटे यांचा गौरव करण्यात येणार आहे.
यासोबतच मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार सुकनजी बाफना, वारी सेवा रत्न पुरस्कार विकेश मुथा तसेच गोमाता रक्षण वीर पुरस्कार पवन ढेरंगे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या आणि वारीच्या माध्यमातून पिढ्यान्पिढ्या भक्तीचा वारसा पुढे नेणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे, तसेच त्यांच्या सेवेतून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश आहे.
वारीच्या अखंड परंपरेला समर्पित असलेला हा सोहळा भक्ती, परंपरा आणि सामाजिक कृतज्ञतेचा अनोखा संगम ठरणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी
