BJP Pravin Darekar criticizes Shiv Sena MP Shrirang Barne : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे यंदाच्या लोकसभा निवडणूकीत 7 खासदार निवडून आले. 13 जागा लढवून 7 खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विजयाचा स्ट्राईक रेट महायुतीत सर्वात चांगला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्रिपद वाटपात मात्र शिवसेनेबाबत दुजाभाव करण्यात आल्याचे सांगत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली. श्रीरंग बारणे यांनी महायुतीत असूनही उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने संतापलेल्या भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी आता बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महायुतीत राहून जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे चुकीचे –
“महायुतीतील पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यानी आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात. जाहीर विधाने करणे टाळवीत. महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे, योग्य आहे असे मला वाटत नाही. श्रीरंग बारणे व अनिल पाटील यांची नाराजी ना पक्षाकरिता, ना अजित पवारांकरिता, ना शिंदेंकरिता फायदेशीर ठरणार आहे. आज जर बारणे प्रतापराव जाधव यांच्याजागी मंत्री झाले असते, तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे अशा प्रकारचे विधान त्यांचे आले असते. परंतु आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप, नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून हे वक्तव्य आहे” असे सांगत दरेकर यांनी बारणेंना सुनावले. ( BJP leader Pravin Darekar criticizes Shiv Sena MP Shrirang Barne after his comment on Modi cabinet )
राज्यात आमचे 105 आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री –
“आज राज्यात भाजपाचे 105 आमदार असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. पाच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे आमच्या आकड्याला इथे काहीच किंमत नाही का?” असा सवालही प्रवीण दरेकरांनी केला. तसेच “आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदेंसोबत युती केलेली असून त्याचे सुतोवाच खासदार श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे. आम्ही जागांसाठी एकत्रित आलो नाही. तशा प्रकारची भुमिका बारणे किंवा संबंधितांनी घ्यायला पाहिजे. महायुतीतील पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा असून महायुतीतील सर्व प्रवक्ते, नेत्यांकडून आहे. लोकसभेची निवडणूक संपली आहे म्हणून आता बारणे व पाटील बोलायला मोकळे झालेत. त्यांच्यासाठी आमच्या आमदार, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केले आहे हे त्यांनाही माहिती आहे. परंतु आपल्याला मिळाले नाही बोलले तर काय फरक पडतो, पाच वर्ष मी खासदार आहे ही त्यांची भुमिका योग्य नाही,” असे खरमरीत शब्दांत प्रवीण दरेकरांनी बारणेवर टीका केली.
काय म्हणाले होते बारणे?
“एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का केला? एक खासदार असणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे होते, तर मग कुटुंबिायांविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांनीही मंत्रिपद द्यायला हवे होते. तसेच भजपाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवे होते,” असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले होते.
अधिक वाचा –
– जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne
– कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News