भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष फोडण्याचा कोणताही प्रयत्न होत नाही. तथापि, या दोन पक्षांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वाबद्दल प्रचंड नाराजी असून ते पक्ष स्वतःहून राजकीयदृष्ट्या बुडतील. आगामी काळात भाजपामध्ये अनेक आश्चर्यकारक पक्षप्रवेश झालेले दिसतील, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
विधान परिषदेच्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटील असतील व त्यांना शिक्षक परिषद समर्थन देईल, अशी घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली. किरण पाटील व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये पत्रकार परिषदेस उपस्थित होते. ( BJP Maharashtra State President Chandrashekhar Bawankule Press Conference Allegations on Congress and NCP )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे) हे पक्ष सोबत आले होते. पण तीन पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या रिक्षाची तीन चाके वेगवेगळ्या दिशेला आहेत. हे तीनही पक्ष आपसात इतके भांडतील की त्यांची दाणादाण उडेल. सत्तेच्या अडीच वर्षात मुख्यमंत्री कोणाला भेटत नव्हते तर पालकमंत्री केवळ मतदारसंघापुरते होते. त्यांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. परिणामी या पक्षांमध्ये काहीही होऊ शकते.
???? वसंतस्मृति, दादर येथे माध्यमांशी संवाद https://t.co/8pJMzuiiuw
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) October 22, 2022
ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना अडीच वर्षे काम करण्याची संधी होती पण त्यांनी त्यावेळी हिंदू सणांवर बंदी घातली. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्री आणि दिवाळी अशा सर्व सणांवरील निर्बंध उठवले. भारतीय जनता पार्टीने हिंदू संस्कृतीतील सण धुमधडाक्यात साजरे केले तर त्यावर राजकारण म्हणून टीका योग्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हे करण्यापासून कोणी अडवलेले नाही. त्यांनी सत्तेत असताना या सणांसाठी पुढाकार घेतला नाही आणि आता विरोधी पक्ष असतानाही ते भाजपाप्रमाणे मराठी दांडिया किंवा दीपोत्सव का करत नाहीत ?
हेही वाचा – “मोदी सरकारचा ‘ रोजगार मेळा ’ म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट !”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामध्ये कोणतेही राजकारण नाही, असेही बावनकुळे म्हणाले. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्वीट करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे हा संस्कृतीचा भाग आहे. त्यावरून राजकारण करू नये, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या साडेआठ वर्षांच्या कारकिर्दीत लाखो तरुणांना रोजगार मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांच्या पुढाकाराने 75,000 तरुणांना नियुक्तीपत्रे देणे ही दिवाळीच्या वेळी सर्वांना आनंद देणारी घटना आहे, अशा शब्दात त्यांनी स्वागत केले.
अधिक वाचा –
हिंदू देवदेवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीसाठी ठेऊ नये, हिंदू समिती कामशेतचे विक्रेत्यांना आवाहन