कार्ला (ता. मावळ) येथील एकवीरादेवी देवस्थानबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. मावळ तालुक्यातील कार्ला येथील प्रसिद्ध एकवीरादेवी देवस्थानमधील राजकीय हस्तक्षेपाला बांध घालणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. 24 ऑगस्ट) दिला आहे. देवस्थानच्या न्यासामधील दोन संचालकांची निवड करताना कोणतीही गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या आणि देवीचे खरे भक्त असलेल्यांचीच निवड व्हावी, यादृष्टीने न्या. सुनील शुक्रे आणि न्या. फिरदोश पूनीवाला यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. ( Bombay High Court Passed An Order On Ekvira Devi Temple Director Election At Karla In Maval Taluka )
देवस्थानाच्या संचालक मंडळातील निवडणुकीवरून दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर पुणे सहायक धर्मादाय आयुक्तांकडून अंतिम अहवाल येईपर्यंत उच्च न्यायालयाने 2018 साली मंदिर न्यासावर प्रशासकीय मंडळ नेमले. त्यानंतर न्यायालयाचे अतिरिक्त रजिस्ट्रार यांना पर्यवेक्षक नेमून सहायक धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यामार्फत संचालक मंडळावरील 7 संचालकांची रितसर निवड करण्यात आली. या 7 संचालकांकडून उर्वरित दोन संचालकांच्या पदांसाठी इच्छुक भक्तांकडून अर्ज मागवून त्यातून निवड केली जाते. त्याप्रमाणे सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर 60 हून अधिक अर्ज आले.
मात्र, या प्रक्रियेत प्रचंड राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे जाणवल्याने नवी मुंबईतील इच्छुक अर्जदार चेतन पाटील यांनी निरीक्षकांना गोपनीय पद्धतीने निवड होण्याबाबत विनंती केली होती. संचालक मंडळातील 7 संचालकांवर प्रचंड दबाव असल्याने त्यांना जाहीर निवड करण्यास सांगण्याऐवजी गोपनीय पद्धतीने निवड करण्यास सांगावे, अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, आपल्या मर्यादित अधिकारांमुळे निरीक्षकांनी त्याबाबत असमर्थता व्यक्त केली. म्हणून पाटील यांनी एड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत प्रलंबित याचिकेतच हस्तक्षेप अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीअंती खंडपीठाने निवड मंडळाला अनेक निर्देश देतानाच 29 ऑगस्ट रोजीची निवडप्रक्रिया पुढे ढकलण्याचाही आदेश दिला. ( Bombay High Court Passed An Order On Ekvira Devi Temple Director Election At Karla In Maval Taluka )
न्यायालयाने निवड मंडळाला दिलेले निर्देश
- मुलाखत घेणाऱ्या निवड मंडळाने सर्व अर्जदारांबाबत गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे अहवाल पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडून मागवावे
- पुणे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी सात दिवसांच्या आत सर्वांचे अहवाल द्यावे आणि त्यानंतर निवड मंडळाने मुलाखती घ्याव्यात
- गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आणि कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत सदस्य असलेल्या अर्जदारांचा निवड प्रक्रियेत मंडळाने विचार करू नये
- देवस्थानातील कारभार पूर्णपणे राजकीय हस्तक्षेपमुक्त राहण्याकरिता मंडळाने ही खबरदारी घेणे आवश्यक आहे
- दोन संचालकांची ही निवडप्रक्रिया सुरळीत होण्याकरिता निवडणूक निरीक्षकांनी विनंती केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी सरकारी खर्चाने पोलिस बंदोबस्त पुरवावा
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ राज ठाकरेंच्या भेटीला; देवस्थानबाबत राज ठाकरेंचा ग्रामस्थांना शब्द, म्हणाले…
– एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा विदेशी मद्यसाठ्यासह 3 जण ताब्यात