मनोज जरांगे पाटील यांनी आज (शनिवार, दि. 23 डिसेंबर) बीड जिल्ह्यात झालेल्या विराट आणि इशारा सभेतून मोठी घोषणा केली आहे. पुढील महिन्यात दिनांक 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली. तसेच समोर जमलेल्या विराट समुदायाला जरांगे पाटलांनी तयारीला लागा, असेही आवाहन केले. तसेच जालन्यातील अंतरवाली सराटी येथून आपण मुंबईला पायी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी बीड येथे इशारा सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठ्यांचं पुढचं आंदोलन आता मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. 20 जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेट उद्या म्हणजेच 24 डिसेंबरला संपणार आहे. ”देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार”, असा इशारा मनोज जरांगे यांनी आज शनिवारी (दि. 23 डिसेंबर) बीड इथे सभेत दिला.
सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची विराट रॅली पार पडली. त्यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगेंनी भुजबळ यांचा उल्लेख येवल्याचा येडपट असा केला. तसेच, शांत असलेल्या मराठ्यांना डाग लागला असल्याचेही जरांगे म्हणाले.
सभेला जमली विराट गर्दी, जरांगेंनी दिला सरकारला इशारा –
“देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका,” असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “तुम्ही एकदा प्रयोग केलाय. तुम्हाला अंतरवलीचा प्रयोग भोगावा लागतोय. आता सावध व्हा. कोट्यवधी मराठा एकत्र आला आहे. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं (छगन भुजबळ) ऐकून मराठ्यांवर अन्याय केला. तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल. हा फक्त बीड जिल्हा आहे. अजून महाराष्ट्र बाकी आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे,” असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
अधिक वाचा –
– नाताळ, नववर्ष आणि शौर्य दिन : पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी विशेष अधिकार प्रदान, वाचा नियम
– वडगावात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त गुरूचरित्र वाचन पारायण सोहळा; महिला भक्तांची लक्षणीय उपस्थिती
– आमदार शेळकेंच्या उपस्थितीत नवीन समर्थ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण संपन्न