कार्ला ते मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून सदर पुलाचे काम 31 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा एकविरा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिसरातील गावांना त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नव्यानेच पर्यटन क्षेत्र म्हणून मळवली परिसर विकसित होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बंगले भाड्याने दिले जात आहेत. या परिसरात जगप्रसिद्ध भाजे लेणी, तसेच लोहगड आणि विसापूर हे किल्ले असून मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक या परिसरामध्ये येत असतात. पुलाचे काम पूर्ण न झाल्यास येणाऱ्या पर्यटकांना व कार्ला मळवली परिसरातील पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच 25 गावांचा संपर्क तुटणार असल्याने या भागातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक या सर्वांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ( Bridge over Indrayani River between Karla and Malvali is incomplete )
त्या शिवाय नदीपात्रात पुलाचे काम सुरू आहे. त्याकरिता शेजारून तात्पुरत्या स्वरूपामध्ये मातीचा भराव करून रस्ता बनवण्यात आला आहे. नदीपात्रात काम करताना जे मातीचे उत्खनन करण्यात आले आहे, ती माती देखील पात्रात पडून आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी मातीचा हा राडाराडा बाजूला न केल्यास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पूराचे पाणी आजूबाजूच्या भात शेतीमध्ये पसरून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशाप्रकारचे नुकसान टाळण्यासाठी व या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय व पर्यटन व्यवसायावर येणारी गदा रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवस रात्र एक करत सदरचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करावे, अशी मागणी एकविरा कृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
या बाबतचे निवेदन वडगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता दराडे साहेब यांच्या कार्यालयात जाऊन एकविरा कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत मोरे, नंदकुमार पदमुले, गुलाब तिकोणे, विजय तिकोणे, उस्मान इनामदार, अमित ओव्हाळ, नवनाथ कडु, रोहिदास हुलावळे, विकास वाल्हेकर व एकवीरा कृती समितीचे सदस्य व कार्ला, मळवली परिसरातील ग्रामस्थ यांनी दिले आहे.
अधिक वाचा –
– गोविंदा आला.. गोविंदा आला.. पण ज्यांच्यासाठी आला त्यांचे नावच विसरला ! ‘आदरणीय’ बोलून विषय संपवला । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभेत महायुतीत खदखद, त्यामुळे थेट दिल्लीतून आलंय पथक ? पाहा काय झालं या पथकाचं… । Maval Lok Sabha
– टिळा झाल्यावर होणाऱ्या नवऱ्याचे प्रेमसंबंध उघडकीस आल्याने तरूणीची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार ! Maval Crime