Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. रात्री दहा वाजल्यानंतर निवडणूक प्रचार फेरी काढून नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल शेळके यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल शेळके यांच्या समर्थकांकडून रात्री पावणेबारा वाजेपर्यंत प्रचार फेरी काढण्यात आली होती. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निवडणूक विभागाचे कर्मचारी दीपक भाऊराव राक्षे (वय 53, रा. सोमाटणे फाटा) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमदार सुनिल शेळके (वय 45) यांच्यासह नामदेव सावळेराम दाभाडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावळचे आमदार व महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारार्थ नामदेव दाभाडे यांनी मंगळवारी (दि. 5 नोव्हेंबर) शिरगाव हद्दीतील आढले खुर्द व चांदखेड या गावांमध्ये प्रचार फेरीचे आयोजन केले होते. त्यासाठी मावळ विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियम व अटीनुसार प्रचार फेरीला परवानगी दिली होती.
मात्र अन्य गावांत नागरिकांच्या प्रतिसादामुळे शेळकेंना या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला आणि येथील प्रचार फेरी रात्री दहा वाजल्यानंतर काढण्यात आली. रात्री दहानंतर प्रचारास बंदी असताना देखील ही फेरी काढण्यात आली. रात्री पावणेबारा वाजेपर्यंत फेरी सुरू होती. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले
– …तर विरोधकांवर धमक्यांचे फोन करण्याची वेळच येणार नाही – आमदार सुनिल शेळके
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा पवनानगर, तिकोनापेठ येथे रुट मार्च । Lonavala Police