Dainik Maval News : शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत, हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. संग्रहालयात मान्यवरांनी पाहणी केली. यावेळी 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग अशा चार टपाल तिकीटांचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ( Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh Exhibition Satara )
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा असून त्यांची शिकवण, तत्वे अंगिकारल्यास आयुष्याची लढाई आपण सहज जिंकू. शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या, कर्तृत्वाच्या खुणा जिथं कुठं असतील तिथून त्या शिवप्रतापाच्या भूमीत पुन्हा आणल्या जातील. लंडनहून सातारा येथे आणण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या दर्शनातून त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडते. ही वाघनखे म्हणजे त्यांची वीरगाथा आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढे यश ही मोठे हे त्यांच्या जीवनातील विविध घटनांमधून दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशनकुमार शर्मा, आंतरराष्ट्रीय व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे कार्यालय प्रमुख निकोलास मर्चंट, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे, वृषालीराजे भोसले, पुरातत्व विभागाचे संचालक सुजितकुमार उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– येळसे गावात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न, विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शन
– मोठी बातमी : कासारसाई-कुसगाव धरणात बुडून 17 वर्षीय कॉलेज कुमारचा मृत्यू । Pune News
– पिंपरीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी ‘भव्य विजयी संकल्प मेळावा’, अजित पवारांच्या पक्षाला खिंडार पाडल्यानंतर पहिलीच सभा