“निसर्ग हाचि वर्ग, एकमेव स्वर्ग । सुशोभुया मार्ग सेवाभावे ।। ” या पंक्तीने प्रेरित होऊन “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” च्या वतीने संकल्पित “श्री तीर्थक्षेत्र स्वच्छता अधिवेशन” चे पर्व श्री क्षेत्र देहू येथून सेवाभावी वृत्तीने सुरू करण्यात आले.
नुकत्याच पार पडलेल्या जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या औचित्याने फाल्गुन एकादशी योगी समिती सदस्यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र देहू येथे मंदिर आवारात आणि इंद्रायणी नदीतीरी असलेल्या पवित्र घाट परिसरात नि:संकोचपणे स्वच्छता सेवा अर्पण करण्यात आली. या प्रसंगी समिती सदस्यांच्या आवाहनाला साद देत स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन या पवित्र कार्यास चालना प्राप्त करून दिली. या उपक्रमास हातभार लावलेल्या प्रत्येक उपस्थित व्यक्तींना समितीच्या वतीने प्रशस्तीपत्र, अन् अंतर्गृह रोपटे देऊन गौरविण्यात आले. ( Cleanliness campaign at Dehu village on behalf of Shri Devdarshan Yatra Samiti Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काही तरुण आपल्या मंदिर परिसरात उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबवत आहेत, असे कळताच श्री क्षेत्र देहू मंदिर संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यक्ष नितीन महाराज मोरे, माजी विश्वस्त रामशेठ मोरे, माजी अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी दखल घेतली. आसपासचा ओला आणि सुका घनकचरा विलग करून त्याचे योग्यरित्या नियोजित कचरा संकलन केंद्रात विघटन करीत सर्व ठिकाणी केलेल्या निर्जंतुकीकरणाने परिसरातील चैतन्य प्रफुल्लित झाले.
याचेच कौतुक करत संस्थानिकांनी समितीचा यथोचित गौरव केला. समितीच्या वतीनेही संस्थानिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या इतिहासातील काही रंजक माहिती सांगून या सर्वांनी धार्मिक क्षेत्रात असेच कार्यरत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्वच्छतेचा निर्मळ संदेश समाजापुढे ठेवण्याच्या समितीच्या पवित्र हेतूचे एकादशी निमित्ताने दर्शनास आलेल्या सर्वच भाविकांनी कौतुक केले.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर संस्थानातील सर्व देवतांचे मनोभावे दर्शन घेऊन सर्व उपस्थित समिती सदस्य सभामंडपात बिजलीनगर(आकुर्डी) येथील “स्वरांजली महिला भजनी मंडळ” च्या वतीने सुरू असलेल्या सुश्राव्य भजन सेवेत तल्लीन झाले. या मंडळाच्या महिला सदस्यांचाही समिती तर्फे सन्मान करण्यात आला. एकादशीच्या निमित्ताने समितीच्या वतीने दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना फराळ वाटपाचेही आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडीतील वयोवृद्ध माउलींनी या बद्दल सर्वांना आशीर्वाद दिले.
समितीचा हा निर्मळ हेतू साध्य करण्यासाठी बबनराव मोरे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी आणि देहू ग्रामपंचायतीच्या माजी महिला सरपंच शुभांगी मोरे आणि माननीय बापूशेठ मोरे यांची मोलाचे सहकार्य लाभले. समितीच्या वतीने उपस्थित सदस्यांनी सर्वांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– ‘आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं’; तब्बल 25 वर्षांनी शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन, संस्थानकडून खास सत्कार
– वन्यजीवांसाठी स्वर्ग असलेला तालुका; मावळच्या पक्षी वैभवात आणखी एक मानाचा तुरा, नक्की वाचा