पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती – मावळ तालुक्यातील नायगाव या खेडेगावातील रहिवासी सविता अविनाश गाडे यांची पुणे मेट्रो पायलटपदी निवड झाल्याबदल नायगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सविता गाडे या मावळातील नायगाव येथील रहिवासी अविनाश गाडे यांच्या पत्नी आहेत. त्यांचे माहेर गोराई 1 ( मुंबई ) येथील असून, त्यांचे शिक्षणही मुंबईलाच झाले आहे. त्या बीई मेकॅनिकल असून, नुकत्याच घेण्यात आलेल्या मेट्रो पायलटच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्या पुणे मेट्रोच्या सेवेत रुजू झाल्या आहेत. 45 दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता त्या आवश्यकतेनुसार पिंपरी – चिंचवड ते सिव्हिल कोर्ट अथवा वनाज ते रूबी हॉल या दोन्ही मार्गावर मेट्रो पायलट म्हणून कार्यरत आहेत. नायगाव ग्रामस्थांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब असल्याने गावच्या वतीने त्यांचा नुकताच नागरी सत्कार करण्यात आला.
लोणावळ्यात भव्य राखी प्रदर्शन – लोणावळा वुमन्स फाउंडेशनच्या वतीने भव्य राखी प्रदर्शन तसेच विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला IPS सत्यसाई कार्तिक यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व व्यवसायिक महिलांचे अभिनंदन केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राखी प्रदर्शन बघण्यासाठी तसेच राखी खरेदी करण्यासाठी महिला, तरुणी, विद्यार्थिनींनी मोठी गर्दी यावेळी केल्याचे दिसून आले. फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या स्थानिक महिलांना सक्षम करण्याचे उद्देश असून येणाऱ्या काळात असे अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत अशी माहिती फाउंडेशनच्या संस्थापक ब्रिंदा गणात्रा यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
कुसगाव बु. ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रता कारवाईस स्थगिती – कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या चार सदस्यांवरील अपात्रतेच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली आहे. पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. सरकारी जागेत अतिक्रमण करत बांधकाम केल्याप्रकरणी सत्ताधारी गटातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश वसंत गुंजाळ, सुजाता रामचंद्र ठुले, फरिन मज्जिद शेख, शैला भरत मोरे यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अपात्र ठरविले होते. या निकालाच्या विरोधात अपात्र सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. अपात्रतेचा निकाल सुस्पष्ट नसल्याचा दाखला देत नैसर्गिक न्यायाने अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्या निकालास स्थगिती दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे.
लोणावळ्यात गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप – प्रमोद जव्हेरी फाउंडेशनच्या वतीने परिसरातील 25 गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. फाउंडेशनच्या अध्यक्षा फाल्गुनी जव्हेरी, जिंजर दवे, चंद्रकांत नाईक, प्रताप पंडित, कल्पना काकडे, योगिता कोकरे, विजय सिनकर, रचना सिनकर, अरुण लाड, अर्जुन पाठारे, चारुलता कमलवार, सुजाता मेहता, रेश्मा शेख, सुरेखा पाडाळे, नंदकुमार जोशी उपस्थित होते. गरजू, होतकरू आणि प्रशिक्षित महिलांना मदतीचा हात देण्यात येतो, असे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. पुजारी म्हणाले, ‘‘महिलांनी अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होणार आहे.’’
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘अवजड’ बुद्धीच्या वाहन चालकांमुळे सामन्यांचे जीव धोक्यात, हाईट बॅरिकेट्स पुन्हा निकामी! MSRDC कडूनही दुर्लक्ष
– पदभार स्विकारताना सरपंचाने घेतली संविधान शपथ! मुळशी तालुक्यातील पौड गावातील घटना, राज्यात होतेय चर्चा – Video
– दुर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी