दैनिक मावळ, संवादक – संध्या नांगरे : मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे 39वे वार्षिक स्त्री साहित्य संमेलन येत्या रविवारी (दि. 17 डिसेंबरला) पुण्यात होत आहे. त्यानिमित्ताने मंडळाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका-कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्याशी प्रतिनिधी संध्या नांगरे यांनी केलेली साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची वाटचाल उलगडणारी बातचीत… ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- प्रश्न : साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची स्थापना कशी झाली ? आणि प्रारंभीच्या काळात मंडळाचे स्वरुप कसे होते?
अंजलीताई : सन 1965 मध्ये साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची स्थापना झाली. त्या काळातील मान्यवर लेखिका संजीवनी मराठी, पद्मा गोळे, सरिता पदकी, शांता किर्लोस्कर या चौघी आणि आणखी काही मैत्रिणी एकमेकींच्या घरी जाऊन साहित्यविषयक गप्पा मारायच्या. एकमेकींना कविता वाचून दाखवायच्या. त्यांच्या एकत्र येण्याचं स्वरुप घरगुती होतं. पुढंपुढं या वाचन-लेखन करणारया मैत्रिणींची संख्या वाढत गेली आणि एक संघटित स्वरुप यावे म्हणून या मैत्रिणींनी ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ ही संस्था स्थापन केली.
सुरुवातीला मान्यवर लेखिका मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायच्या. हळूहळू निश्चित स्वरुप ठरत गेले. दर महिन्याला मंडळाचे कार्यक्रम होऊ लागले. आकाशवाणीवर मंडळाचे कार्यक्रम व्हायचे. शांता शेळके, शैलजा राजे, लीला दिक्षित, योगिनी जोगळेकर या मान्यवर लेखिका मंडळाच्या उपक्रमांत सहभागी व्हायच्या. पुढे, लेखक-कवी-पत्रकार यांच्या मुलाखतीतून लेखन प्रवास उलगडणे असे अनेकविध कार्यक्रम होऊ लागले.
नेहमीच लेखिकांचे सहकार्य लाभत राहिले. गेली 40 वर्षे डॉ. मंदा खांडगे मंडळाच्या विविध पदांवर कार्यरत राहून मंडळाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्या कार्यवाह होत्या, नंतर अध्यक्ष होत्या आणि आता त्या मंडळाच्या प्रमुख कार्यकारी विश्वस्त आहेत. सोबतच डॉ. कल्याणी दिवेकर, मंजिरी ताम्हनकर, डॉ. ज्योत्स्ना आफळे, डॉ. निलीमा गुंडी यांचं मार्गदर्शन लाभत असतं.
- प्रश्न : मंडळाचे सध्याचे स्वरुप आणि कार्यपद्धती सांगा.
अंजलीताई : सध्या मंडळाचा दर महिन्याला एक कार्यक्रम होतो, होणारा प्रत्येक कार्यक्रम उत्तमच असतो. अलीकडेच ‘संवाद कलावंतांच्या आईशी’ हा एक सुंदर कार्यक्रम झाला. संपादन कार्यशाळा पार पडली. विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली जातात. सदस्यांसाठी लघुकथा लेखन, ललित लेख लेखन, विडंबन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी काव्यलेखन, शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता सादरीकरण अशा स्पर्धा घेतल्या जातात. वार्षिक पुरस्कार दिले जातात.
‘बाल आनंद मेळावा’ हा आमच्या मंडळाचा फार छान उपक्रम आहे. यात मंडळाच्या सदस्या शाळांमध्ये जाऊन मुलांशी मनमोकळा संवाद साधतात, गप्पागोष्टी- गाणी – नकला करणे – सामान्य ज्ञानाची प्रश्नोत्तरे अशी विविध कृतिसत्र घेतली जातात. मुलांना प्रमाणपत्रही दिले जाते. शाळांना पुस्तकाचे संच भेट दिले जातात. यातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, कला आत्मसात करण्याची आवड निर्माण होते व वाढीस लागते.
महाकवी कालिदास जयंतीनिमित्त मंडळाच्या सदस्यांसाठी वर्षा सहल आयोजित केली जाते. मंडळाचा आता what’s aap ग्रुप हा आहे, या ग्रुपवरही भगिनी आपापल्या कार्यक्षेत्रातील विविध गोष्टींची देवाणघेवाण करतात त्यातून ज्ञानात भर पडते आणि ‘स्त्री साहित्य संमेलन’ हा मंडळाचा महत्वाचा वार्षिक उपक्रम अखंडपणे सुरु आहे. यंदा स्त्री साहित्य संमेलनाचं 39 वं वर्ष आहे.
- प्रश्न : स्त्री साहित्य संमेलनाची सुरवात कशी झाली?
अंजलीताई : डॉ. मंदा खांडगे यांच्या संकल्पनेतून ‘स्त्री साहित्य संमेलन’ हा उपक्रम सुरु झाला. हा मंडळाचा वार्षिक उत्सवच असतो. भेटीगाठी, संवाद, साहित्यिक आदानप्रदान, पुरस्कार वितरण असं संमेलनाचं स्वरुप असतं. यातून भगिनींना साहित्याची मेजवानीच मिळते. आजवर साहित्यिक तारा भवाळकर, प्रतिभा रानडे, वीणा गवाणकर, मंगला गोडबोले, संजीवनी खेर, मीना वैशंपायन आणि इतर अनेक मान्यवर साहित्यिकांनी स्त्री साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविलं आहे. यंदा एकोणचाळीसावं स्त्री साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ लेखिका, कला समीक्षक व अनुवादक डॉ. श्यामला वनारसे संमेलनाच्या अध्यक्षा आहेत.
संमेलनात ‘कला आणि अभिरुची’ या विषयावर परिसंवाद होईल. ‘कवितेच्या अवकाशात’ हा दिग्गज कवींच्या कविता वाचनाचा कार्यक्रम होईल. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ निर्मित ‘संशोधन : स्वरुप आणि व्याप्ती’ या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. दिवंगत ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या कविता व गाण्यांवर आधारित ‘हिरव्या बोलीची शब्दपैठणी’ हा कार्यक्रम होणार आहे.
- प्रश्न : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा काय वाटा आहे?
उत्तर : मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांना संमेलनील परिसंवादात वक्ता म्हणून आमंत्रित केले जाते. कविकट्टा या उपक्रमात मंडळाच्या सदस्या सहभागी असतात. असा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सदस्य भगिनींचा सहभाग वैयक्तीक आहे.
- प्रश्न : ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या ग्रंथाची निर्मिती काही खंडांमध्ये साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने केली आहे…त्याबद्दल सांगा.
अंजलीताई : सन 1997 मध्ये मंडळामध्ये संशोधन विभाग मंदाताईंच्या कल्पनेतून सुरु झाला. त्या संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत. हा विभाग मंडळाचा मानबिंदू आहे. या विभागामध्ये ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या ग्रंथाची निर्मिती झाली. त्यामध्ये सन 1850 पासून मराठी भाषेतील स्त्री साहित्याचा अभ्यास केला गेला. त्याचे चार खंड प्रकाशित झाले असून पाचव्या खंडाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय ‘भारतीय स्त्री साहित्य’ हा विविध राज्यांतील विविध भाषांमधील स्त्री साहित्यविषयक ग्रंथही मंडळाने काढला आहे व त्याचे भाषांतर होऊन Indian Women’s Literature हा ग्रंथही प्रकाशित झाला आहे. गतवर्षी वार्षिक संमेलनात ‘भारतीय विचारवंत आणि समाजसुधारक यांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथनिर्मितीसाठी अनेक मान्यवर लेखिकांनी मेहनत घेतली आहे.
- प्रश्न : मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्यात साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे कोणकोणते योगदान आहे?
अंजलीताई : स्त्री साहित्याचा मागोवा या खंडांद्वारे आम्ही गेली २५ वर्षे भारतातील स्री साहित्याची समीक्षा केली आहे..हे मोठं योगदान आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यापीठात हे ग्रंथ अभ्यासकांना मदत करत आहेत. मान्यवर साहित्यिकांनीही या कामासाठी मंडळाचे भरभरुन कौतुक केलं आहे. याशिवाय मंडळाच्या व्यासपीठावर सतत साहित्यिक विचारमंथन होत असतं, त्यातून नवनिर्मिती होते.
वाचनाची-लिहिण्याची आवड असणारया अनेक भगिनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मंडळाच्या सदस्या झाल्या आहेत, त्या लिहू लागल्या आहेत, मंडळाच्या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत. अशा पद्धतीने मंडळ स्त्रियांमध्ये वाचन-लेखन-साहित्य-कला-संस्कृती विषयक जाणीव निर्माण करत आहे हेही महत्वाचं योगदान आहे. नुकताच साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे मंडळाला ‘निर्मलकुमार फडकुले’ पुरस्कार उत्तम काम करणारी संस्था म्हणून मिळाला आहे.
- प्रश्न : साहित्यप्रेमी भगिनी मंडळामध्ये युवा-तरुण भगिनींचा सहभाग कितपत आहे व पुणे शहर परिसराबाहेर मंडळाचा विस्तार झाला आहे का?
अंजलीताई : साहित्यप्रेमी भगिनी मंडळामध्ये ज्येष्ठ भगिनींबरोबरच 40-50 वयोगटातील भगिनी मोठ्या संख्येने सहभागी आहेत. पण 35 – 40 वर्षाखालील भगिनी नाहीत. सध्याची वेगवान जीवनशैली, वाचन-लेखनाची कमी होत असलेली आवड या कारणांमुळे युवा वर्गाचा साहित्यक्षेत्रातील सहभाग कमी आहे. म्हणून आम्ही शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेत आहोत. जेणेकरून भविष्यात चांगले वाचक-लेखक घडतील. सध्या पुणे शहर हेच मंडळाचे कार्यक्षेत्र आहे. आमचे ग्रंथ आणि पुरस्कार या माध्यमातून मंडळ राज्यभरात पोचलं आहे पण अद्याप शाखा नाहीत. शहराबाहेर वेगवेगळ्या भागात, ग्रामीण भागात शाखा सुरु करण्यासाठी तिथल्या भगिनी पुढे आल्यास त्यांचं स्वागतच आहे.
प्रश्न : साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची भविष्यातील वाटचाल कशी असेल?
अंजलीताई : सन २०२५ मध्ये मंडळाचा हिरक महोत्सव सुरु होईल, हे वर्ष आम्ही विविध उपक्रमांनी साजरं करणार आहोत. त्याची रुपरेषा ठरवत आहोत. तसेच स्त्री साहित्य, आमच्या सारखी आणखी काही मंडळं, बालवाड्.मय अशा विषयात छोटे छोटे प्रकल्प हाती घेण्याचा मानस आहे.
प्रश्न : सर्व भगिनींना आवाहनपर काही सांगा.
अंजलीताई : स्त्रीया सर्व कौटुंबिक जबाबदारया चोख पार पाडतात पण त्यांनी आपल्या या एकच कोशातून बाहेर पडून इतर जग पाहावं. कला-वाचन-लेखनाची आवड जोपासण्यासाठी व जपण्यासाठी साहित्यप्रेमी भगिनी मंडळ उत्तम व्यासपीठ आहे. आवर्जून भगिनींनी मंडळामध्ये सहभागी होऊन आपला विकास घडवावा. ( dainik maval Interview with president of sahitya premi bhagini mandal writer anjali kulkarni )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या जलजीवन योजनेत ‘भ्रष्टाचार’ लक्षवेधीनंतर मंत्री गुलाबराव पाटलांची मोठी घोषणा! देखरेख समिती नेमणार
– अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही! कामशेतमध्ये पोलिसांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
– मावळ तालुक्यातील कल्हाट आणि निगडे गाव ‘इको-सेन्सिटिव्ह’ झोनमधून वगळा; खासदार श्रीरंग बारणेंची मागणी