दैनिक मावळ, संवादक – संध्या नांगरे : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन सोमवारी (दि. 25) चिंचवडमध्ये होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकाचे लेखक, शहरातील नामवंत सूत्रसंचालक तथा मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांच्याशी प्रतिनिधी संध्या नांगरे यांनी केलेली खास बातचीत. ही बातचीत पुस्तकाविषयी आहेच अन् श्रीकांत चौगुले या एका गुणवान शिक्षकाचा निवेदन व लेखन क्षेत्रातील प्रवास उलगडणारी आहे… ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
- प्रश्न : तुमचं मूळ गाव कोणतं आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कधी व कसे स्थायिक झालात?
श्रीकांतदादा : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात माझं बालपण गेलं आणि शिक्षणही झालं. तिथून जवळचं असलेलं हंचनाळ हे माझं मूळ गाव. तेव्हा कमी शिक्षणात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि सोबतच थोडीफार स्वतःची शेतीही करायची, या उद्देशानं मी डी. एड. पदवी पूर्ण केली होती.
“एकदा मी पुण्यात गणेशोत्सवासाठी आलो होतो. त्याच दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शिक्षक भरतीची जाहिरात आली होती. मी प्रयत्न केले आणि काम झालं. महानगरपालिकेच्या शाळेत रुजू झालो. असं नोकरीच्या निमित्तानं मी पिंपरी-चिंचवडमध्ये आलो, 35-36 वर्ष मी शहरात स्थायिक आहे. सध्या रहाटणीमधील पीसीएमसी पब्लिक स्कूल या शाळेत प्रभारी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. नोकरीत स्थिर झाल्यावर मी माझं पुढचं शिक्षण घेतलं. आजवर बी. एड., एम. एड., पत्रकारिता (बी. जे.), मराठी, समाजशास्त्र, इंडोलॉजी या विषयांत एम.ए. पदव्या पूर्ण केल्या आहेत.”
- प्रश्न : तुम्ही शहरातील नामवंत सूत्रसंचालक आहात. सूत्रसंचालनाकडे कसे वळलात?
श्रीकांतदादा : नोकरीसोबतच इतर उपक्रमांत सहभाग घेता घेता योगायोगाने मी सूत्रसंचालक म्हणून घडत गेलो. शहरात आल्यावर उत्सवात, कार्यक्रमात मी निवेदन करायचो. ते ऐकून मला विविध ठिकाणी निवेदन करण्यासाठी बोलावलं जाऊ लागलं आणि सूत्रसंचालक म्हणून माझी ओळख झाली. उत्तम सूत्रसंचालन करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणं, विविध घडामोडी-विषयांची किमान माहिती असणं आणि सातत्यानं वाचन करत असणं हे आवश्यक असतं. या तिन्ही गोष्टी माझ्याकडे असल्यानं मला सूत्रसंचालन चांगलं जमू लागलं. सूत्रसंचालनाच्या अनेक संधी मिळत गेल्या. मी पुण्यातील अनेक कार्यक्रमांना मी जायचो. तिथं माननीय सुधीर गाडगीळ आणि इतर अनेक निवेदकांचं निवेदन ऐकायला मिळालं. या निवेदनांचा प्रभाव कळत-नकळत माझ्यावर पडत गेला, तसे संस्कार होत गेले आणि यशस्वी सूत्रसंचालक म्हणून मी घडलो.
प्रश्न : मुलाखतकार म्हणूनही तुमची ओळख आहे. तुमच्यातील मुलाखतकाराविषयी सांगा.
श्रीकांतदादा : सूत्रसंचालक म्हणून ओळख निर्माण झाली असल्यानं मुलाखती घेण्याची संधी मिळत गेली. दिग्गज कलाकार, साहित्यिक आणि इतर अनेक मान्यवरांच्या मुलाखती मी घेतल्या. साधारण १०-१५ वर्षापूर्वी दूरदर्शनच्या सह्यादी वाहिनीवर ‘कलारंग’ हा कार्यक्रम व्हायचा. यात अनेक कलाकारांशी मुलाखतीतून संवाद साधला. डॉ. नरेंद्र जाधव यांची मी मुलाखत घेतली होती. ही मुलाखत इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली होती.
मुलाखतीचा एक किस्सा सांगावासा वाटतो. एका कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत मला घ्यायची होती. पण, कोणत्या सोनालीची हे समजलं नव्हतं. सिनिअर सोनालीच्या मुलाखतीची माझी तयारी होती. पण तिथं अचानक ज्युनिअर सोनालीची मुलाखत घ्यायची हे समजलं. माझी तयारी नव्हती पण ही ऐनवेळची मुलाखत छान झाली याचं समाधान वाटलं. याशिवाय ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे मी महाराष्ट्रभर पाचशे प्रयोग केले. या कार्यक्रमाची संकल्पना माझी होती. हा कार्यक्रम फार गाजला.
- प्रश्न : तुमच्या लेखनप्रवासाबद्दल सांगा.
श्रीकांतदादा : मला वाचनाची, लेखनाची आवड आधीपासूनच होती. या आवडीमुळं मी पत्रकारितेचं ही शिक्षण घेतलं आणि लिहित राहिलो. विविध वर्तमानपत्रात लेखन केलं. काही परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. मानपत्रांचं लेखन केलं, पुस्तकांना प्रस्तावना दिल्या. विशेष अंक, दिवाळी अंकांचं संपादन केलं. बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती संपादन मंडळात काम करण्याची संधी दहा वर्ष मिळाली. पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळं हा अनुभव फार महत्वाचा राहिला.
बालचित्रवाणीसाठी लेखन केलं. तसंच वर्ल्ड स्मिथ प्रकाशनाच्या बालरंग मराठी रीडर या पुस्तकाच्या पाच भागांचं संपादनही माझ्याकडून झालं. पुस्तकांमध्ये ‘शालेय परिपाठ व उपक्रम’, ‘शिक्षण संस्कार’, ‘आपले सण-आपली संस्कृती’, ‘रयतेचा राजा’, ‘घरदार’, ‘बाप्पा मोरया’, ‘यशवंतराव चव्हाण’ आणि ‘गाव ते महानगर’ ही माझी पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत. आता गाव ते महानगरची दुसरी आवृत्ती येत आहे.
- प्रश्न : पिंपरी-चिंचवड गाव ते महानगर हे पुस्तक कसं आकाराला आलं?
श्रीकांतदादा : गाव ते महानगर हे पुस्तक 20 वर्षांपूर्वी आलं आहे. एप्रिल 2003 मध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळी दैनिक लोकसत्ताच्या ‘अंतरंग’ पुरवणीमध्ये मी सातत्याने लिहायचो. पिंपरी-चिंचवडमध्ये कोणकोणती ठिकाणं पाहण्यासारखी आहेत, त्या ठिकाणांची सविस्तर माहिती देणारं सदर मी लिहायचो. एकदा सांगवी गावावर लेख लिहिताना शहराच्या जुन्या अनेक रंजक गोष्टी समजल्या.
जुन्या काळात पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात जाणंही अवघड होतं. इथून लोक टांगा, घोडागाडी करुन पुण्याला जायचे. सांगवीचे सरपंच पुण्यातून घोड्यावरुन यायचे, दापोडीला गव्हर्नर बंगला होता व मुंबई प्रांताचा कारभार काही महिने दापोडीतून चालला होता. अशी जुनी माहिती मिळाल्यावर मला जिज्ञासा निर्माण झाली आणि पिंपरी- चिंचवडमधील गावागावांची माहिती संकलित करण्याचं, लिहिण्याचं माझं कामच सुरु झालं. त्यावेळी शहराला 30-35 वर्ष झाली होती. पिंपरी-चिंचवडबद्दलचं हे लिखाण होत गेलं आणि त्यातून ‘गाव ते महानगर’ हे पुस्तक आकाराला आलं. या पुस्तकाच्या लेखनासाठी जुनी वर्तमानपत्रं, काही विशेष अंक अभ्यासले. जुन्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. एक धागा मिळाला की त्या अनुषंगानं पुढची माहिती मिळवली आणि हे पिंपरी-चिंचवड शहरावरचं हे पहिलं पुस्तकं झालं.
- प्रश्न : पुस्तकात कोणती प्रकरणं समाविष्ट आहेत?
श्रीकांतदादा : शहरात समाविष्ट असणारया गावांचा इतिहास, उद्योगपर्व – इथं औद्योगिकीकरण कसं सुरु झालं, एमआयडीसी कशी आली, उद्योग आकडेवारी, शहराचा उदय आणि विकास, अण्णासाहेब मगर यांची कारकिर्द, शहरातील विविध प्रकल्प, कर्तृत्वाला सलाम, शहरातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्था, निवडक व्यक्ती – त्याचं कार्य आणि योगदान ही प्रकरणं पुस्तकात आहे. शेवटच्या परिशिष्टामध्येही महत्वाची माहिती आहे.
- प्रश्न : दुसऱ्या आवृत्तीविषयी…
श्रीकांतदादा : पहिली आवृती प्रकाशित झाल्यावर अल्पावधीतच संपली. त्यामुळं अभ्यासकांना या पुस्तकाची छायांकित प्रत द्यावी लागत होती. म्हणून दुसरी आवृत्ती करणं गरजेचं वाटलं. ही आवृत्ती दोन भागाची आहे. भाग एक आत्ता प्रकाशित होत आहे, तो पहिल्या पुस्तकाचीच दुसरी आवृत्ती आहे आणि भाग दोन सहा महिन्यांनी प्रकाशित होईल. त्याचं काम सुरु आहे.
- प्रश्न : आता शहराची उद्योगनगरी ही ओळख बदलली आहे असं वाटतं का?
श्रीकांतदादा : निश्चितच आता शहराची उद्योगनगरी ही ओळख बदलली आहे. पूर्वी इथं लोकसंख्येच्या तुलनेत कारखान्यांची संख्या अधिक होती. आज शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या घरात गेली आहे आणि तेव्हा असणारया कारखान्यांपेक्षा निम्मे कारखाने आता राहिलेत. त्यामुळं उद्योगनगरी ही ओळख आता कमी होतेय.
अगदी सुरवातीच्या काळात पिंपरी-चिंचवड गावागावांचं होतं. गायरानं, वस्त्या, लहान गावं इथं होती. गेल्या काही वर्षात शहर एकसंध झालं आहे. पूर्वी कामगारांचे वास्तव्य मोठं होते आता तसं नाही. अनेक पेशांचे, विविध भागातील लोक शहरात राहताहेत. त्यामुळं शहरात बहुसांस्कृतिकता निर्माण झाली आहे.
- प्रश्न : बदललेल्या शहरात कोणती जुनी गोष्ट पुढंही टिकून राहिली पाहिजे असं वाटतं? आणि भविष्यात व्यापक नकाशावर पिंपरी-चिंचवड शहराची कोणती ओळख असेल?
श्रीकांतदादा : पिंपरी-चिंचवड हे ग्रामीण संस्कार जपणारं शहर होतं. पण वाढत्या शहरीकरणात गावांची पारंपरिक यात्रा-उत्सवाची लोकसंस्कृती कमी-कमी होत चालली आहे. ही पारंपरिक लोकसंस्कृती नेहमीच टिकून राहायला हवी. भविष्य काळात ‘पुण्यक्षेत्र’ अशीच पिंपरी-चिंचवड शहराची ओळख असेल. कारण, इथं भौतिक विकासाची घोडदौड लोकांना खुणावत आहेच, पण त्याबरोबरीनं मनमनात वसलेलं देहू-आळंदी हे तीर्थक्षेत्र आता शहराचा भाग झालं आहे. पूर्वी ही ठिकाणं शहरापासून लांब असलेली ठिकाणं होती, आता शहर तिथपर्यंत पोचलं आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवड शहराची पुढच्या काळातील ओळख ही पुण्यक्षेत्र अशीच होईल.
संवाद* : शहराची जडणघडण उलगडणारं हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे.
श्रीकांतदादा : आपण राहतो त्या शहराविषयी अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी नागरिकांनी हे पुस्तक वाचता येईल. अभ्यासकांना हे पुस्तक उपयोगी आहे आणि शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हे पुस्तक पोचवणार आहोत. जेणेकरुन भविष्यातील हे शहरवासीय, सुजाण नागरिक आपल्या पिंपरी-चिंचवड शहराला आणखी प्रगतीपथावर नेतील व सर्वांगसुंदर बनवतील. ( dainik maval interview with srikant chowgule author of the book pimpri chinchwad gaon te mahanagar )
अधिक वाचा –
– शौर्य दिन, 1 जानेवारी : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे
– वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!
– सलग सुट्ट्यांची आली लाट, पण वाहतूक कोंडीने लावली वाट! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्राफिक जॅमने प्रवासी हैराण